न्यूयॉर्क महापौरपदाच्या डेमोक्रेटिक पक्षांतर्गत निवडणुकीत जबरदस्त आघाडी घेऊन भारतीय-अमेरिकी वंशाचे नेते झोहरान ममदानी यांनी अमेरिकेच्या राजकारणाला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यापासून अनेकांना त्यांच्या या कामगिरीची दखल घेणे भाग पडले आहे.

न्यूयॉर्क राज्याचे माजी गव्हर्नर अँड्रू कुओमो यांच्यावर ममदानी यांनी कुरघोडी केल्यानंतर ट्रम्प यांनी समाजमाध्यमांत डेमोक्रेटिक पक्ष आणि ममदानी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘अखेरीस हे घडत आहे. डेमोक्रॅट्सनी सीमारेषा ओलांडली आहे. १०० टक्के कम्युनिस्ट माथेफिरू असलेल्या झोहरान ममदानी यांनी पक्षाची प्राथमिक फेरी जिंकली आहे. ते महापौर बनण्याच्या मार्गावर आहेत’’ असे ट्रम्प यांनी लिहिले. तर ‘‘डेमोक्रेटिक पक्षाचे नवे नेतृत्व’’ असे लिहित वान्स यांनी टोलेबाजी केली.

ममदानी यांचा मोठा राजकीय उदय होण्यामागे डेमोक्रेटिक पक्षातील डावीकडे झुकणारे मतदार कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. शिवाय जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे पक्षापासून दुरावलेल्या मुस्लिम मतदारांना चुचकारण्याचाही हा पक्षांतर्गत प्रयत्न असल्याची चर्चा आहे. नोव्हेंबर २०२६मध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन उमेदवाराचा पराभव केल्यास ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रम्पविरोधी लाटेचा फायदा?

ट्रम्प यांच्या हडेलहप्पी धोरणांमुळे त्यांच्याविरोधात मतदारांमध्ये काहीशी नाराजी असून ममदानी यांना डेमोक्रेटिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. ‘‘ममदानी यांना उमेदवारी दिल्यास त्याचा डेमोक्रेटिक पक्षावर दीर्घकालीन दुष्परिणाम संभवत नाहीत. उलट त्यांना फायदाच होऊ शकेल, असे कोलंबिया विद्यापीठातील प्रा. बसिल स्मिकल यांनी सांगितले.