पीटीआय, गुवाहाटी
प्रसिद्ध गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना बक्सा जिल्हा कारागृहात आणत असताना संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर हल्ला केला. काही वाहने जाळण्यात आली आणि दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी आसाम पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मुशालपूर परिसरातील तुरुंगाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमले आणि तुरुंगात असलेल्या आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांचा ताफा येताच त्यांनी वाहनांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मुशालपूर शहर आणि तुरुंगाच्या लगतच्या भागात बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत, तर पुढील आदेशापर्यंत संपूर्ण बक्सा जिल्ह्यात इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा निलंबित करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा आयुक्त गौतम दास यांनी सांगितले.
दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी, पत्रकार आणि स्थानिक रहिवाशांसह अनेक लोक जखमी झाले आणि वाहनांच्या काचा फुटल्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. झुबीनला न्याय मिळावा यासाठी आरोपींना जनतेच्या स्वाधीन करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी झुबीन गर्ग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुवाहाटी येथे जाणार आहेत.