03 August 2020

News Flash

मुद्रा भद्राय राजते।

लेखमालेच्या अगदी प्रारंभी आपण आजच्या काळाला समाजशास्त्रज्ञांनी वापरलेला ‘मेटामॉडर्न’ हा शब्द आपण पाहिला.

समूहांच्या नेत्यांचं राजपददेखील कुटुंबव्यवस्था व सामूहिक-आर्थिक व्यवस्थांच्या स्थर्यासोबत आनुवंशिक होत गेलं व राजाभोवती केंद्रित असलेली शासनव्यवस्था.. राजेशाही दृढ होत गेली.

१९८८ साली दूरदर्शन वाहिनीद्वारे प्रसारित झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘भारत : एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत आपल्यापकी अनेकांना आठवत असेल. ऋग्वेदातील ऋषींच्या विश्वनिर्मितीविषयीच्या चिंतनाचे प्रतिबिंब असलेल्या ‘नासदीय सूक्त’ या सुप्रसिद्ध सूक्ताच्या हिंदी अनुवादाचे लयबद्ध पठण असलेलं ते शीर्षकगीत आजही क्वचितप्रसंगी अनेकांच्या गुणगुणण्यातून ऐकायला मिळतं. या सृष्टीच्या प्रारंभापूर्वी सत् (भौतिक अस्तित्व) नव्हते आणि असत् (अनस्तित्व/अस्तित्वाचा अभाव) देखील नव्हते, असं हे सूक्तद्रष्टे ऋषी उद्घोषित करतात. या दोन शब्दांपकी ‘सत्’ (अस्तित्व) या शब्दातून शाश्वत, चिरंतन अस्तित्व असलेले महन्मंगल तत्त्व सूचित होते (मूळ धातू आहे : अस् – असणे, to be) तर ‘असत्’ या शब्दातून अशाश्वत, तत्कालिक-अल्पजीवी, अविद्याग्रस्त असं तत्त्व अनुलक्षित होते. ‘सत्’ या अस्तित्वपर शब्दातूनच इथल्या तात्त्विक परंपरांमध्ये ‘सत्य’ (truth) ही संकल्पना आकाराला आली असं दिसतं. ‘सत्’ या शब्दाने प्रतीत होणाऱ्या अस्तित्वसूचक कल्पनेला महन्मंगल मानण्यामागची धारणा विश्वसृजनासारख्या प्रक्रियेला एक सकारात्मक, पावित्र्यदर्शक धारणेचा मापदंड लावणे ही होती. आणि त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या शाश्वतत्वामुळंच ‘सत्य’ (३१४३ँ) हे तत्त्व चिरस्थायी आणि विश्वनिर्मितीचे कारण असलेल्या ब्रह्म तत्त्वाचे खरे स्वरूप असल्याची धारणा वैदिक आणि औपनिषदिक तत्त्वज्ञानात विकसित झाल्याचं दिसतं. ‘असतो मां सद्गमय’सारख्या मंत्रांतून व्यक्त होणारी ‘अविद्य्ोतून शाश्वत अशा अस्तित्वाचे स्वरूप असलेल्या ज्ञानाकडे स्वत:ला नेण्याची’ उपनिषदांची ज्ञानमार्गी ऊर्मी, भगवान बुद्धांच्या करुणाजनक अशा चिंतनातून साकारलेल्या आर्यसत्यांतून साकारणारा दु:खनिरोधाकडे जाणारा मार्ग किंवा जैनांच्या चिंतनातून सत्य बोलण्यावर दिला गेलेला भर अशा वेगवेगळ्या परंपरांतून आपल्याकडे ‘सत्’ हे तत्त्व आणि ‘सत्य’ हे मूल्य प्रतिपादित केले गेले. या सर्व मतप्रवाहांच्या मुळाशी असलेलं सत् (अस्तित्व) हे तत्त्व सजीव-निर्जीव अस्तित्वाला कवेत घेत मानवी व सजीवसृष्टीचाच विचार करतं.

लेखमालेच्या अगदी प्रारंभी आपण आजच्या काळाला समाजशास्त्रज्ञांनी वापरलेला ‘मेटामॉडर्न’ हा शब्द आपण पाहिला. मानवी इतिहास-संस्कृती आणि सामाजिकतेविषयीच्या सिद्धांतनासंबंधीच्या अद्ययतन अशा बहुविद्याशाखीय, विविध चिकित्सात्मक परंपरा आणि पद्धतींच्या आधारे आपल्याला उपखंडाचा इतिहास जोखायचा आहे, हे आपण ठरवलं होतं. त्यासाठी या चच्रेचा पहिला टप्पा म्हणून  उपखंडामधील प्राचीन इतिहासातल्या प्राथमिक मानता येतील अशा प्रमुख धारणांच्या धाग्यांची आणि त्यांच्या बहुविध कालसापेक्ष पदरांची उकल प्रारंभीच्या लेखांतून केली. गेल्या लेखात आपण आधुनिक भारतातील विविध सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय धारणांची उकल करत मध्ययुगीन-प्राचीन अशा इतिहासकालांच्या गाभ्याकडे आपल्या चच्रेला नेण्यासाठी एक दिशा निश्चित केली. त्यानुसार १९४७ साली मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्यानंतर आपल्या पूर्वजांनी, देशाच्या राजकीय-संवैधानिक शिल्पकारांनी आखून दिलेल्या चौकटी, त्यांचे ऐतिहासिक-सांस्कृतिक औचित्य तपासत आपल्या चर्चा पुढे न्यायच्या आहेत. आधुनिक काळात स्वातंत्र्य प्राप्त

करून एक उद्दिष्ट साध्य केल्यावर आपल्या देशाचे स्वतंत्र, सार्वभौम असं अस्तित्व हे आपल्या परंपरांचा यथार्थ परामर्श घेत कालोचित अशा आधुनिक मूल्यांशी त्यांची सांगड घालणाऱ्या मूल्यव्यवस्थांवर बेतलेलं असायला हवं, अशी धारणा या स्वतंत्र भारतातील पहिल्या पिढीतील राजकीय-सांस्कृतिक फळीची होती असं दिसतं. गेल्या लेखात पाहिलं त्यानुसार, सम्राट अशोकाचे धम्मचक्र, अशोक स्तंभ अशी विश्वशांतीचे प्रतीक मानली गेलेली चिन्हे आपण राष्ट्रीय चिन्हे म्हणून स्वीकारली. ही आपली राजमुद्रा आणि तिच्या खालच्या भागात त्या मुद्रेतून प्रतीत होणाऱ्या अर्थाला आधारभूत असलेला उपनिषदातील मंत्रदेखील तितकाच लक्षणीय आहे.

थोडक्यात, या राजमुद्रेतून प्रकट होणारी जागतिक पातळीवरील ओळख ही मानवी समाजाच्या कल्याणासाठी झटणारा, त्यासाठी पूरक अशा मूल्यांना सर्वोच्च महत्त्व देणारा देश म्हणूनच आकाराला यावी ही दृष्टी आपल्या पूर्वजांनी या राष्ट्रीय चिन्हांतून आपल्याला दिली. मानवी समाजातले सर्व भले-बुरे व्यवहार सुव्यवस्थित करण्यासाठी, सर्व चांगल्या-वाईट अभिव्यक्तींच्या पसाऱ्यांतून मूल्याधिष्ठित अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असे या देशात निपजलेले, बाहेरून येऊन या देशात मिसळून गेलेले मानवकल्याणपर सत्यांचे सारेच मार्ग विजयी होतात आणि होत राहतील, हा उदात्त विचार या वाक्यातून प्रतीत होतो. स्वतंत्र भारताचा जन्म होताना आपल्या समाजाला आकार देणाऱ्या प्राचीन उदात्त धारणांना वैश्विकतेचं असं उदात्त, व्यापक परिमाण स्वतंत्र भारताच्या शिल्पकारांनी आणि घटनाकारांनी आपल्या देशाच्या राष्ट्रीय ब्रीदवाक्याला दिलं. त्या जोडीला, आपल्या देशाची ही भूमिका ठरवताना या मंडळींनी-चिंतकांनी उपखंडातील इतिहासाविषयीचे आपले विचार आणि मतांच्या चौकटीदेखील आखून दिल्या. नव्या भारताची दिशा कशी असावी, याविषयी मांडलेली ही मते परस्परविरोधी वा टोकाची असल्याचं गेल्या लेखात काही मतांचा परामर्श पाहताना लक्षात आलंच असेल.

मात्र, त्या-त्या संदर्भात आदर्शवत् मानल्या गेलेल्या सर्व चौकटींना ‘सत्’ अर्थात चिरंतन मानवी अस्तित्व हा मुख्य आधार असल्याचं भान होतं, हे आपल्याला निश्चितच दिसून येतं. मानवी अस्तित्वातून प्रत्यंतरास येणाऱ्या राग, लोभ, ईष्र्या, हिंसा, जिजीविषा (जगण्याची इच्छा), विजिगीषू वृत्ती इत्यादी साऱ्या भावना या चिंतकांच्या विचारांतून व चरित्रांतूनही अभिव्यक्त होतात. ही सारी मंडळी पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीत आणि पाश्चात्त्य विद्यापीठांत शिकून आली असल्याने त्यांच्या विचारांवर पाश्चात्त्य विचारांचादेखील दृढ प्रभाव असल्याचं दिसून येतं. पाश्चिमात्य विचारांनी आणि मूल्यांनी प्रभावित झालेल्या या चिंतकांनी उपखंडातील स्थानीय इतिहास आणि तत्त्वज्ञान परंपरांना आधुनिक परिप्रेक्ष्यात आपल्या समाजासमोर पुनव्र्याख्यानित केलं. पाश्चात्त्य धारणा आणि बहुविध, बहुपेडी देशी संकल्पना यांची सांगड घालण्याच्या या प्रयत्नांमध्ये झालेली पाश्चात्त्य किंवा देशी परंपरा व धारणांची सरमिसळ, परस्पर विसंगती, तर काही नसर्गिक साम्यं या प्रक्रियांचा अविभाज्य भाग बनली. त्यामुळं आपल्या ‘धारणांच्या धाग्यां’च्या उकलीचा हा प्रवास अधिकाधिक रोचक आणि आव्हानात्मक होणार आहे! पाश्चात्त्य किंवा देशी दृष्टिकोनांच्या सरमिसळीचा आढावा त्या त्या धारणांचं सुलभ सरसकटीकरण, सरधोपट तुलना, इत्यादी अंगांनी न करता बहुस्तरीय ऐतिहासिक संदर्भाच्या कालसापेक्ष उकलीतून करणे सयुक्तिक होईल. विश्वशांती, युद्धखोरीपासून परावृत्त राहण्याचा आग्रह, सहिष्णुता व मतमतांतरनिरपेक्ष सहअस्तित्व ही प्रमुख मूल्यं आपल्या राष्ट्रीय चिन्हांतून अभिव्यक्त होत असली तरी या आदर्शवादी चौकटीच्या निर्मितीमागील धारणांचा इतिहास तपासणे आपल्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा वैदिक-बौद्ध-जैन व तत्कालीन अन्य परंपरांकडे वळावं लागेल.

वेदग्रंथांच्या ऐतिहासिक परिशीलनातून प्रतीत होणारा वेदकाल किंवा वैदिक समाज हादेखील स्वाभाविकत:च अन्य मानवी समाजांच्या इतिहासांप्रमाणेच साऱ्या भल्या-बुऱ्या मानवी भावनांची अभिव्यक्ती करतो. सोमवल्लीच्या रसाने भरलेली तळीच्या तळी प्राशन करणारा, वैदिक विधींतूनच उत्पन्न झालेल्या आपल्या शत्रूला- ‘वृत्रा’ला वज्राने मारणारा देवांचा अधिपती, वीरदेव ‘इंद्र’(पाहा : या मालिकेतील ‘मिथकांचे पदर आणि विवेक’ हा लेख, ११ मार्च २०१८) हा वैदिक साहित्यात पौरुषत्व आणि पराक्रमाचे सर्वोच्च प्रतीक म्हणून गौरविण्यात आला आहे. वेदकाळात आपल्या समूहांना आर्य या गुणवाचक, प्रतिष्ठावाचक विशेषणांनी संबोधून घेणारे समूह आपसांत किंवा ‘दस्यू’ या शत्रुवाचक विशेषणांनी युक्त असलेल्या समूहांशी युद्ध करताना आपल्याला दिसून येतात. ऋग्वेदातील सातव्या मंडलात मिळणाऱ्या दहा राजांच्या सुप्रसिद्ध युद्धाचा (‘दाशराज्ञ युद्ध’) संदर्भ यासंदर्भात महत्त्वाचा आहे. आज पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या रावी नदीच्या (प्राचीन नाव- ‘परुष्णी’) परिसरात झालेल्या या युद्धात ‘पुरू’ आणि ‘भरत’ या वेदकालीन समाजातील समुहांत झालेल्या या युद्धात त्या गणांचे राजे आणि त्यांचे पुरोहित-प्रेरक असलेले विश्वामित्र आणि वसिष्ठ हे ऋषी यांचा आंतरिक संघर्ष दिसून येतो. हे वैदिक समूहांतील आंतरिक संघर्ष आणि ‘दस्यू’ किंवा दुष्ट मानल्या गेलेल्या वैदिकेतर समूहांशी झालेल्या संघर्षांतून, तसेच त्यांना अनुसरून किंवा समांतररीत्या आकाराला येणाऱ्या कर्मकांडाधिष्ठित संकल्पनांतून उपखंडातील मानवसमूहांचा इतिहास व त्यातून आकाराला येणारे राजकारण व राजकीय विचार विकसित झाले, असं दिसून येतं.

या आधीच्या लेखांतून आपण पाहिलेल्या ऋग्वेदातील ‘ऋत’ आणि त्यातून आकाराला येणाऱ्या ‘धर्म’ या संकल्पनांचा परामर्शदेखील आपल्याला या संदर्भात घ्यावा लागेल. ‘ऋत’ संकल्पनेचे नियमन करणारा ‘वरुण’ हा देव विश्वाचा सम्राट व शास्ता असल्याप्रमाणे विश्वातील प्रत्येक घटनेवर आपल्या अनुचरांद्वारे, हेरांद्वारे बारीक लक्ष ठेवून असतो व तो अपराधी लोकांना विविध प्रकारे दंडदेखील देतो. याच कल्पनेतून साकारलेल्या, वरुणाच्या गुणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राजव्यवस्थेचा उदय वैदिक ग्रंथांतून आपल्याला दिसून येते. त्यासाठी आवश्यक असलेली युद्धकम्रे, राजनीतीपर डावपेच यांना पूरक ठरणारी कर्मकांडे, यज्ञविधींचे संदर्भदेखील वैदिक व वेदोत्तरकालीन उपखंडामध्ये दिसून येतात. उपखंडातल्या विविध गणराज्यांमधला संघर्ष, त्या गणराज्यांवर अधिपतित्व दर्शवणारी चक्रवर्तित्वाची कल्पना या यज्ञविधींद्वारे प्रस्थापित होते. हे यज्ञविधी अर्थातच राजकीय आणि कर्मकांडप्रधान व्यवस्थांच्या भागधारकांचे- अर्थात ‘राजन्य’ व ‘ब्राह्मण’ या वर्णाचे- हितसंबंध आणि वर्चस्व राखण्याचेच काम करतात, हे उघड आहे. ऋग्वेदातील उत्तरकालीन सूक्ते आपल्याला या उतरंडीशी निबद्ध असलेल्या समाजव्यवस्थेचे आदिम संदर्भ दाखवतात. गेल्या लेखात आपण यज्ञाद्वारे होणाऱ्या सृष्टीनिर्मितीचे सूचन करणाऱ्या ‘पुरुषसूक्ता’तील ‘यज्ञेन यज्ञमयजन्त देवा:’ या मंत्राचा परामर्श घेतला होता, त्याच सूक्तात वर्णव्यवस्थेच्या निर्मितीला प्रमाणित करणारे मंत्रही येतात. या अशा मंत्रांतून वैदिक काळातील समाजनिर्मितीच्या प्रक्रियेत वर्णव्यवस्था आधारभूत राहिल्याचं दिसून येतं. दाशराज्ञ वगरे युद्धांतून दिसून येणाऱ्या छोटय़ा समूहांच्या नेत्यांची, समूहांची राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठा व स्थान हे अशा संकल्पना आणि कर्मकांडपर विधींतून बळकट होत गेले. समूहांच्या नेत्यांचं राजपददेखील कुटुंबव्यवस्था व सामूहिक-आर्थिक व्यवस्थांच्या स्थर्यासोबत आनुवंशिक होत गेलं व राजाभोवती केंद्रित असलेली शासनव्यवस्था- राजेशाही दृढ होत गेली. या व्यवस्थेतील राजाला सामाजिक-राजकीय आणि धार्मिक मान्यता मिळवून देण्यासाठी निर्माण झालेल्या अभिषेकासारख्या आणि ‘राजसूय’, ‘अश्वमेधा’सारखे विविध ‘रिच्युअल्स’-विधीतल्या सुफलनात्मक संकेतांतून राजपरंपरेच्या अनुवांशिकतेला प्रमाणित केलं जात असे. या गणराज्यांतील राजसमूहांमध्ये निर्माण झालेल्या चक्रवर्तित्वाच्या स्पर्धाना (अन्य राजांहून आपले श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याविषयीच्या, मांडलिकत्वाविषयीच्या कल्पनांना) व अन्य सरंजामवादी व्यवस्थांना राजसूय-अश्वमेधादिक यज्ञविधींतून प्रामाण्य मिळत गेलं. या प्रक्रियांचा आढावा एका लेखात घेणं जागेअभावी कठीण आहे. मात्र, पुढच्या भागांत वेद, पुराणे आणि महाकाव्यांतल्या तसेच गुप्त-शुंग काळातल्या या अशा कर्मकांडव्यवस्था आणि राजव्यवस्था यांच्या संगनमतातून आकाराला आलेल्या ऐतिहासिक व्यवस्थांचे सांस्कृतिक-राजकीय इतिहासातले स्थान आणि त्यांतून उदयाला आलेल्या धारणांचा परामर्श घेत ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे.

अतिशय गुंतागुंतीच्या, परस्परविसंगत धारणांचे ‘पॅकेज’ खांद्यावर घेत आपला देश लवकरच लोकशाही व्यवस्थेची सत्तरी गाठणार आहे. लोकशाही व्यवस्था स्वीकार केलेल्या सार्वभौम भारत गणराज्यातील सांस्कृतिक विश्वात परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही विचारव्यूहांचा संमिश्र प्रभाव व संघर्षजनक अशी गुंतागुंत आज ठळकपणे दिसून येते आहे. इतिहास-पुराणांतील घटना, व्यक्ती व सामाजिक-राजकीय व्यवस्थांविषयीची उत्कट आस्था आणि आधुनिक लोकशाही मूल्यं या द्वैताशी जुळवून घेताना होणारा सांस्कृतिक-सामाजिक संघर्ष यांवर समाधानकारक उत्तर आपला समाज आणि आपल्या व्यवस्था अजूनही शोधत आहेत. ‘धारणांच्या धाग्यां’ची उकल करताना आपल्याला या संघर्षांवर तोडगा किंवा अंतिम उत्तर मिळवता येणार नसलं तरी ऐतिहासिक तपशिलांचं शक्य तितकं वस्तुनिष्ठ आकलन व आजच्या स्वीकारलेल्या व्यवस्थांविषयीचा विवेक यावर काही चिंतनात्मक चर्चा करायचा प्रयत्न आपण करत राहू या. अशा चर्चातूनच आपल्या समाजाची राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक प्रगल्भता अधिकाधिक विकसित होत जाणार आहे.

rajopadhyehemant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2018 12:33 am

Web Title: hemant prakash rajopadhye article in loksatta
Next Stories
1 समाज-धारणांच्या गाभ्याकडे
2 धर्म, धम्म आणि श्रद्धा
3 तानि धर्माणि प्रथमानि आसन्।
Just Now!
X