News Flash

घास ३२ वेळा चावून खावा असं का म्हणतात?; असं केल्याने काही फायदा होतो का?

आपण अन्न का खातो? आपल्याला जगायला, काम करायला शक्ती मिळावी म्हणून!

प्रातिनिधिक फोटो

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

आपण अन्न का खातो? आपल्याला जगायला, काम करायला शक्ती मिळावी म्हणून! म्हणजेच आपण खातो त्या अन्नाचं शक्तीत किंवा उर्जेत रूपांतर व्हायला हवं. आपण जी पोळी, भाजी, भात आणि आमटी खातो ते काही तसंच्या तसं रक्तात मिसळू शकत नाही. तेव्हा आपण जे काही खातो त्या साऱ्याचं रूपांतर काही ठरावीक स्वरूपाच्या रसायनात होतं आणि मगच ते शरीरात साठवलं जातं किंवा शरीराकडून वापरलं जातं. उदाहरणार्थ अन्नातल्या काबरेहायड्रेटचं रूपांतर शर्करेत होतं.

या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते तीच मुळात तोंडापासून! आपण तोंडात घास घेतला की त्यात ‘लाळ’ मिसळायला सुरुवात होते. या ‘लाळ’ नामक रसायनामुळे आपण घास चावत असताना, अन्नातल्या पिष्टमय पदार्थाचं म्हणजेच काबरेहायड्रेटचं पचन सुरू होतं. म्हणजे पिष्टमय पदार्थाचं रूपांतर रक्तात सहज मिसळेल अशा ग्लुकोजसारख्या म्हणजे शर्करेसारख्या काही पदार्थात होतं. खाद्यपदार्थाचा घास जेवढा जास्त वेळ लाळेच्या संपर्कात येईल तेवढी ती रासायनिक क्रिया उत्तम होते आणि काबरेहायड्रेटचं पचनही चांगलं होतं. आपण चपातीचा एखादा घास ८-१० वेळाच चावून गिळला आणि दुसरा एखादा चपातीचा घास ३०-३२ वेळा चावून चघळला; तर आपल्याला जास्त वेळा चावलेला घास अधिक गोड लागतो हे लक्षात येईल, कारण त्यातल्या काबरेहायड्रेटस पूर्णपणे शर्करेत रूपांतर झालेलं असेल;  म्हणून घास ३२ वेळा चावून खावा हे आपल्या पूर्वजांचं सांगणं किती योग्य होतं, हे आपल्या समजेल.

या संबंधी एक गंमतीदार प्रयोग करून बघता येईल. केमिस्टकडून टिन्क्चर आयोडीनची एक छोटी बाटली आणा. चपातीचा एक छोटासा तुकडा घ्या. त्यावर टिन्क्चर आयोडीनचा एक थेंब टाका. टिन्क्चर आयोडीन काबरेहायड्रेटच्या संपर्कात आलं की निळ्या रंगाचं होतं. चपातीच्या तुकडय़ावर ते निळ्या रंगाचं होतं म्हणजे चपातीत काबरेहायड्रेट आहे. त्याच चपातीचा, पण दुसरा (ज्यावर टिन्क्चर आयोडीन घातलं नाही आहे असा) तुकडा घ्या आणि तो तोंडात घालून चांगला चघळा. पूर्ण चघळून झाल्यावर तो न गिळता एका छोटय़ा ताटलीत घ्या आणि त्यावर टिन्क्चर आयोडीनचा थेंब टाका. आता तुम्हाला इथे निळा रंग न दिसता टिन्क्चर आयोडीनचा मुळचा पिवळट रंगच दिसेल. याचा अर्थ आता तिथे काबरेहायड्रेट राहिलं नाही; त्याचं रूपांतर शर्करेत झाल्यामुळे चघळलेल्या चपातीवर टिन्क्चर आयोडीन निळा रंग देत नाही. अशा छोटय़ा छोटय़ा वाटणाऱ्या गोष्टीतून आपल्याला आवश्यक अन्नपदार्थामागचे साधेसोपे विज्ञान जाणून घेता येणे सहज शक्य आहे.

(टीप: हा मूळ लेख ‘बत्तीस वेळा चर्वण’! मथळ्याखाली प्रकाशित झाला होता.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 7:51 pm

Web Title: should we really chew our food 32 times scsg 91
Next Stories
1 समजून घ्या: ‘मेड इन इंडिया’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘असेंबल्ड इन इंडिया’ प्रोडक्टमधील फरक
2 समजून घ्या सहजपणे : कोविड १९ रुग्णांसाठी डेक्सामेथॅसोनचा वापर
3 समजून घ्या सहजपणे:आता जागेवरच होऊ शकते करोना चाचणी, काय आहे रॅपिड अँटिजेन डिटेक्शन टेस्ट?
Just Now!
X