रेस्तराँ किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणं हे आता अगदीच कॉमन झालं आहे. कुठल्याही हॉटेलमधला शेफ हा आपलं लक्ष वेधून घेतो याचं कारण ठरते ती त्याची खास अशी टोपी. उंच आणि विशिष्ट घड्या असलेल्या टोपीकडे आपलं लक्ष हमखास जातंच. मात्र या टोपीचा जन्म कसा झाला? म्हणजेच या शेफ्सनी ही खास टोपी घालणं कसं सुरु केलं हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ.

शेफसाठी गणवेशाइतकीच महत्त्वाची आहे टोपी

शेफ म्हटलं की त्याचा एक विशिष्ट असा गणवेश असतो. बऱ्याचदा पांढऱ्या किंवा हलक्या तपकिरी रंगाचा असतो. त्यावर ही टोपी असतेच जी लक्षवेधी ठरते. शेफ जी टोपी घालतो त्या टोपीवर साधारण १०० प्लेट्स असतात. त्यामुळे ही टोपी नीट राहते. या टोपीचं मूळ नाव शेफ्स टोक Chef’s Toque असं आहे. टोपी हा शब्द फ्रेंच भाषेतून आला आहे. टोपीच्या प्लिट्स (pleats) आणि शेफ यांचा जवळचा संबंध आहे. त्या टोपीमध्ये जितक्या प्लिट्स असतात तितक्या पाककृती शेफला येतात असं गृहीत धरलं जात असे.

टोपीच्या प्लेट्सची खासियत

एखाद्या शेफने जर १०० प्लिट्स असलेली टोपी घातली आहे आणि तो अंडी किंवा चिकन यांपासून पाककृती तयार करतो तर त्याला १०० पाककृती येतात असं गृहीत धरलं जात असे. आता जितक्या प्लिट्स जास्त असतात तितका तो शेफ पाककलेत निपुण आहे असं गृहीत धरलं जातं. जागरणने हे वृत्त दिलं आहे.

टोपीची उंची काय सांगते?

शेफ जी टोपी घालतात त्या टोपीला एक विशिष्ट उंची असते. काही टोप्या कमी तर काही जास्त उंचीच्या असतात. टोपी जितकी उंच तितका शेफ विविध पाककृतींचा जाणकार असतो असं म्हटलं जातं. तसंच जो मुख्य शेफ म्हणजेच मास्टर शेफ असतो त्याची टोपीही इतर शेफच्या तुलनेत सर्वात जास्त उंचीची असते. शेफच्या वरिष्ठतेप्रमाणे त्याच्या टोपीची उंची ठरते.

टोपीचा इतिहास काय सांगतो?

शेफच्या टोपीबाबत अनेक कहाण्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की इसवी सन पूर्व काळात सन १४६ मध्ये ग्रीक शेफ हे बिजान्टिन या ठिकाणी झालेल्या हल्ल्यातून वाचण्यासाठी पळत होते. त्यावेळी त्यांनी एका मठात आसरा घेतला. तिथे जे भिक्षुक होते त्यांच्या टोप्या लांब होत्या. आपणही त्यांच्यातलेच एक वाटलो पाहिजे म्हणून या शेफ्सनीही तसाच पोशाख केला आणि टोप्या घातल्या. तेव्हापासून टोपी ही शेफच्या पोशाखाचा अविभाज्य भाग झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टोपीबाबतच्या कथा

दुसऱ्या एका कहाणीनुसार सातव्या शतकात या टोपीचा शोध लागला. त्यावेळी असरियात एक राजा होता त्याचं नाव असुरबनिपाल होतं. त्याला विष देऊन मारलं जाण्याची भीती वाटे. त्यावेळी त्यांनी आपल्या मुदपाकखान्यातील आचाऱ्यांना टोप्या दिल्या. त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचं इमान सिद्ध झाल्यावर या टोप्या दिल्या जात. या गोष्टीवरुन असंही सांगितलं जातं की तेव्हापासून आचाऱ्यांच्या डोक्यावर टोपी आली. याबाबत आणखी एक गोष्ट अशी आहे की १६ व्या शतकात इंग्लंडचे राजे हेन्री पाचवे यांना जेवणात एक केस आढळला. त्यामुळे त्यांनी ते जेवण तयार करणाऱ्या शेफचा शिरच्छेद केला. अशा घटना घडू नयेत आणि जेवणात केस पडू नये म्हणून टोपी घालण्याची प्रथा सुरु झाली असंही सांगितलं जातं. एकंदरीत जर पाहिलं तर या टोपीचा इतिहास खूपच रंजक आहे.