करोनासाठीच्या औषधांच्या बनावट विक्रीपासून सावधान! घ्या ‘ही’ खबरदारी

कोणत्याही फॉरवर्डेड मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं पुणे पोलिसांचं आवाहन

medicines
औषधांची खरेदी अधिकृत औषध विक्रेत्याकडूनच करावी, असं आवाहनही पुणे पोलिसांनी केलं आहे. (संग्रहित छायाचित्र)

देशात अजूनही करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहेच. अशावेळी या आजारावरच्या औषधांसाठी नागरिकांची फसवणूक केली जात आहे. आपलीही फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? काय करावं, काय करु नये? याबद्दल पुणे पोलिसांनी माहिती दिली आहे.

कशी फसवणूक होते?

सध्या करोनाच्या उपचारासाठी तसंच म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या बनावट जाहिराती करुन लोकांना फसवलं जात आहे. यासाठी व्हॉटसपवर बनावट मेसेज व्हायरल केले जातात, गुगल सर्चवर बनावट जाहिराती पोस्ट करण्यात येतात. रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा ज्या नागरिकांना अशा औषधांची गरज असते, ते यातली सत्यासत्यता न पडताळता गरजेपोटी दिलेल्या नंबरवर फोन करतात.


फोनवरचा व्यक्ती सदर व्यक्तीकडून औषधासाठीचे पैसे आधीच घेऊन ठेवतो आणि दोन दिवसात औषधं हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येतील अशी बतावणी करतो. हे पैसे गुगल पे किंवा फोन पे अशा ऑनलाईन माध्यमातून मागवले जातात. मात्र,पैसे घेऊनही औषधं मिळत नाहीत.

फसवणूक झाल्यास काय करावे?

अशा प्रकारे फसवणूक झाल्यास नागरिकांनी वेळ न दवडता आपल्या जवळच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवावी. यासाठी नागरिक इमेल सुविधेचाही वापर करु शकतात.

फसवणूक होऊ नये म्हणून काय करावे?

कोविड-१९ संदर्भातल्या सोशल मीडियावर फॉरवर्ड होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर पडताळणी न करता विश्वास ठेवू नका.
कोणत्याही अज्ञात नंबरवर फोन करु नका.
औषधांची खरेदी रुग्ण उपचार घेत असलेल्या रुग्णालयाच्या औषध विक्रेत्याकडून अथवा अधिकृत औषध विक्रेत्यांकडूनच करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व समजून घ्या बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Beware of covid 19 medicine scam dont call on forwarded numbers vsk

ताज्या बातम्या