करोनाचा फैलाव जगभरात झाला आहे. प्रत्येक देश करोनाशी लढण्यासाठी, वाचण्यासाठी वेगवेगळे उपाय योजत आहे. बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. भारतातल्या काही राज्यांमध्येही परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांना करोना निगेटिव्ह अहवाल किंवा लस घेतल्याचं प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं आहे.

आता करोनाचा प्रादुर्भाव काहीसा ओसरु लागला आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणानेही आता वेग घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरचे निर्बंधही हळूहळू कमी करण्यात येत आहेत. यासाठी काही देशांमध्ये जाण्यासाठी व्हॅक्सिन पासपोर्ट अनिवार्य केला असून काही देशांनी अशा प्रकारचा नियम लागू करण्याचा विचार सुरु केला आहे.

व्हॅक्सिन पासपोर्ट म्हणजे काय?

व्हॅक्सिन पासपोर्ट म्हणजे थोडक्यात तुम्ही करोना प्रतिबंधक लस घेतल्याचा पुरावा. ज्यांनी लस घेतली आहे त्यांनाच फक्त हा व्हॅक्सिन पासपोर्ट मिळणार आहे. ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करायचा आहे किंवा परदेशात फिरायला जायचं आहे अशा लोकांसाठी हा व्हॅक्सिन पासपोर्ट महत्त्वाचा आहे.

हेही वाचा- युरोपियन युनियनच्या ‘ग्रीन पास’ यादीत ‘कोविशिल्ड’ का नाही?; EMA ने सांगितलं कारण

सध्या कुठे हा पासपोर्टचा नियम लागू करण्यात आला आहे?

याचवर्षी मार्च महिन्यात चीनने डिजिटल वॅक्सिन पासपोर्टची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा लाभ एका अॅपच्या माध्यमातून घेता येणार आहे.

याचप्रकारे एप्रिल महिन्यात जपाननेही या डिजिटल वॅक्सिन पासपोर्टची घोषणा केली होती. युरोपीय संघानेही आपल्या २७ सदस्य राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी डिजिटल ग्रीन प्रमाणपत्र लागू केले आहे. हे प्रमाणपत्र अशा व्यक्तींना मिळेल ज्यांनी युरोपीय वैद्यकीय संघटनेची परवानगी असलेली लस घेतली असेल, ज्यांच्याकडे करोना निगेटिव्ह अहवाल असेल आणि जे नुकतेच करोनातून बरे झाले आहेत.

ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं ग्रीन पास मिळणं कठीण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत.