पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे पाकिस्तानच्या अनेक नेत्यांकडून अणुबॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अणवस्त्रांच्या बाबतीत नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. जगभरात कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत? एका अणुबॉम्बची किंमत किती असते? त्यांच्या देखभालीचा खर्च किती येतो? अणुहल्ल्याचा निर्णय कोण घेते? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू आहे. त्याविषयी जाणून घेऊ.
अण्वस्त्रांचे होणारे घातक परिणाम
१९५७ मध्ये न्यू मेक्सिकोमध्ये एका विमानातून चुकून एक अणुबॉम्ब पडला. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. १९५८ मध्ये दक्षिण कॅरोलिनामध्ये एका बी-४७ बॉम्बरने अणुबॉम्ब टाकला; परंतु अणुबॉम्ब क्षेपणास्त्रातच राहिला, त्यामुळे विनाश टळला. १९६१ मध्ये दोन अणुबॉम्ब वाहून नेणारे बी-५२ बॉम्बर कॅलिफोर्नियामध्ये कोसळले. १९६५ मध्ये अमेरिकन विमानवाहू जहाजातून सोडलेल्या विमानाने समुद्रात अणुबॉम्ब टाकला. हा अणुबॉम्ब कधीही सापडला नाही.
शीतयुद्धाच्या काळात जगातील एकूण अणुबॉम्बची संख्या जवळजवळ ६०,००० पर्यंत पोहोचली. त्यावरच उपाय म्हणून अणू निःशस्त्रीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्याचाच भाग म्हणून दक्षिण आफ्रिकेनी आपली संपूर्ण अणुशस्त्रे नष्ट केली. असे करणारा दक्षिण आफ्रिका हा एकमेव देश आहे. ऑगस्ट १९४५ मध्ये अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले. त्या हल्ल्यात १,२५,००० ते २,५०,००० लोकांचा मृत्यू झाला. ५० वर्षांहून अधिक काळ या शहरांना अणुबॉम्बचे विनाशकारी परिणाम सहन करावे लागले आहेत.
अण्वस्त्रांच्या देखभालीचा खर्च किती?
दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेने हिरोशिमावर ‘लिटल बॉय’ आणि नागासाकीवर ‘फॅट मॅन’ असे दोन अणुबॉम्ब टाकले. त्यामुळे जपानचे प्रचंड नुकसान झाले. आज जगभरातील देश त्यांच्या अण्वस्त्रांची देखभाल करण्यासाठी दरवर्षी जवळजवळ ९१.४ अब्ज डॉलर्स खर्च करीत आहेत. दर सेकंदाला सुमारे २,८९८ डॉलर्स म्हणजेच जवळजवळ २.५ लाख रुपये खर्च केले जात आहेत. हा आकडा १०० हून अधिक देशांच्या वार्षिक जीडीपीपेक्षाही जास्त आहे.
अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय कोणाचा असतो?
जागतिक स्तरावर राष्ट्रपती किंवा पंतप्रधान थेट अणुहल्ल्याचा आदेश देऊ शकत नाहीत. परंतु, त्यांच्याकडे अधिकृत प्रक्षेपणासाठी आवश्यक असलेले सुरक्षित कोड म्हणजेच स्मार्ट कोड असतात. हा निर्णय सामान्यतः सुरक्षा मंत्रिमंडळ समिती, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) व संरक्षण प्रमुख यांसारख्या सुरक्षा संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर घेतला जातो. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे एक अणू फुटबॉल आहे आणि रशियन राष्ट्राध्यक्षांकडे एक ब्रीफकेस आहे, ज्यात युद्ध योजना, अणू क्षेपणास्त्रे आणि त्यांच्या लक्ष्यांची संपूर्ण माहिती असते.
पाकिस्तानने आण्विक क्षेपणास्त्रे कुठे लपवली आहेत?
पाकिस्तानमध्ये एफ-१६ लढाऊ विमाने मुशाफ (सरगोधा) आणि शाहबाज यांसारख्या तळांवर तैनात आहेत. असे सांगितले जाते की, सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरगोधा वेपन्स स्टोरेज कॉम्प्लेक्समध्ये त्यांची अणुशस्त्रे आहेत. पाकिस्तानकडे अब्दाली, शाहीन, घौरी, हत्फ आणि इतर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आहेत. पाकिस्तानमध्ये अणुहल्ल्यांबाबतचे निर्णय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय कमांड प्राधिकरणाद्वारे घेतले जातात.
भारताकडे कोणती क्षेपणास्त्रे?
भारताकडे अग्नी, शौर्य, प्रलय व ब्रह्मोस यांसारख्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांचा साठा आहे. हा साठा अणुहल्ल्यास सक्षम आहे. परंतु, भारत ‘नो फर्स्ट युज’ अणू धोरणाचे पालन करतो. याचा अर्थ असा की, भारत कधीही अणू शस्त्रांचा वापर करून, हल्ल्याची सुरुवात करणार नाही; परंतु जर हल्ला झाला, तर तो पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल.
कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे?
‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या २०२४ च्या अहवालानुसार, सध्या नऊ देशांकडे अण्वस्त्रे आहेत, ज्यांची संख्या १२,००० हून अधिक आहे. त्यामध्ये रशिया (२,८१५), अमेरिका ( १,९२८), चीन (४१०), फ्रान्स (२९०), ब्रिटन (२२५), भारत (१७२) व पाकिस्तान (१७०), उत्तर कोरिया (३०) या देशांचा समावेश आहे. सर्वांत कमी अण्वस्त्रे उत्तर कोरियाकडे आहेत.
पाकिस्तानच्या अण्वस्त्रसाठ्याची किंमत अंदाजे ४,४५५ अब्ज अमेरिकन डॉलर्स आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तानने त्यांची सर्व अण्वस्त्रे विकल्यास त्यांचे संपूर्ण कर्ज फेडले जाऊ शकते. पाकिस्तानवर अंदाजे २७.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके कर्ज आहे.
अणुबॉम्ब तयार करण्यासाठी येणारा खर्च
सध्या अणुबॉम्ब किंवा वॉरहेड तयार करण्यासाठी १८ दशलक्ष डॉलर्स (१५३० कोटी) ते ५३ दशलक्ष डॉलर्स (४,५१६ कोटी) पर्यंत खर्च येतो. अणुबॉम्ब प्रणालीचा एकूण खर्च ४,५०० कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. परंतु, प्रत्येक देशानुसार खर्चाचा आकडा बदलू शकतो. हे खर्च वेगवेगळ्या देशांमध्ये बदलू शकतात. ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स’च्या १९९८ च्या अहवालानुसार, अमेरिकेतील ‘B61-12’ अणुबॉम्ब अत्यंत प्राणघातक मानला जातो. त्याची किंमत २८ दशलक्ष डॉलर्स आहे. परंतु, यात क्षेपणास्त्र, प्रक्षेपण विमान, प्रक्षेपण पॅड आणि देखभालीचा खर्च धरल्यास अणुबॉम्बची एकूण किंमत सुमारे २७० दशलक्ष डॉलर्स किंवा अंदाजे २,३०० कोटी रुपये आहे.