Highest Revenue Railway Station India: देशभरात रेल्वेचं मोठं जाळं आहे. आशियातली सर्वांत मोठी आणि जगातली चौथी सर्वांत मोठी रेल्वे म्हणून भारतीय रेल्वेकडे पाहिलं जातं. भारतातील जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करणं पसंत करतात. रेल्वे हा भारतीयांसाठी दळणवळणाचा सर्वात मोठा पर्याय आहे. खिशाला परवडणारा आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असल्याने अनेक जण रेल्वेला जास्त प्राधान्य देतात.
भारतीय रेल्वे ही केवळ प्रवासाचे साधन नसून, देशाच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक बनली आहे. वंदे भारत, राजधानी, शताब्दी, तेजस आणि दुरंतोसारख्या अत्याधुनिक गाड्यांमुळे भारतातील रेल्वे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायक झाला आहे. सध्या भारतात दररोज १३,००० हून अधिक गाड्या धावत असून, ७३०० पेक्षा अधिक स्थानकांवर दररोज दोन कोटींहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. या स्थानकांमधून केवळ प्रवासच होत नाही, तर मोठ्या प्रमाणावर कमाईही केली जाते. प्लॅटफॉर्म तिकीट, जाहिराती, दुकान भाडं यातून रेल्वे लाखो-कोटींची उलाढाल करते.
आपण बहुतेक जण समजतो की देशात सर्वाधिक महसूल मिळवणारे रेल्वेस्थानक मुंबईत किंवा कोलकात्यात असणार… पण सत्य थक्क करणारं आहे, कारण दिल्लीच्या मध्यभागी वसलेलं ‘नवी दिल्ली रेल्वेस्थानक’ भारताचं सर्वात श्रीमंत रेल्वेस्थानक ठरलंय. रेल्वेकडून नुकतीच प्रसिद्ध झालेली आकडेवारी सांगते की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकट्या नवी दिल्ली स्थानकाने तब्बल ३,३३७ कोटींची कमाई केली आहे. या स्थानकावरून ३ कोटी ९३ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आणि यामुळेच या ठिकाणी सर्वाधिक महसूल मिळाला. ही कमाई केवळ तिकिटांमधून नव्हे, तर प्लॅटफॉर्म तिकिटे, जाहिराती, स्टेशनवरील सुविधा व व्यापारी संधींमधूनही झाली आहे.
तर दुसऱ्या स्थानावर दमदार कामगिरी करत पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशननं १,६९२ कोटींची कमाई केली आहे. तामिळनाडूमधील चेन्नई सेंट्रल हे उत्पन्नाच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचं रेल्वेस्थानक ठरलं आहे. चेन्नई सेंट्रल रेल्वेस्थानकाने वर्षभरात १,२९९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या स्थानकावरून तीन कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. तेलंगणामधील सिकंदराबाद स्थानकानं १,२७६ कोटींची कमाई करत चौथा क्रमांक मिळवलाय.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या रेल्वेस्थानकामध्ये दिल्लीतील आणखी एका स्थानकाने स्थान मिळवलं आहे. दिल्ली शहराचा दुसरा शिलेदार म्हणजे निजामुद्दीन स्थानक. सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानक पाचव्या क्रमांकावर आहे, ज्याने १,२२७ कोटींचं उत्पन्न दिलंय आणि या स्थानकामधून १.४५ कोटींहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय.