History Of Brinjal Bharta : वांगं म्हटलं की बहुतेक जण नाक मुरडतात. पण, चमचमीत-झणझणीत वांग्याचे भरीत खायला मात्र अनेकांना आवडते. भाकरीबरोबर वांग्याचे भरीत एकदम भारी लागते. महाराष्ट्रात सगळीकडे ही रेसिपी वेगवेगळ्या स्टाईलने बनवली जाते. पण, यात खान्देशातील वांग्याचं भरीत सर्वाधिक लोकप्रिय आहे. वांगी, शेंगदाणे, कांदा, लसूण, टोमॅटो, लाल तिखट असे अनेक पदार्थ वापरून बनवलेले वांग्याचे भरीत किती खाऊ, किती नको असे होते. पण, महाराष्ट्रात चवीने खाल्ला जाणारा हा पदार्थ नेमका आला कुठून? आणि त्याचं वांगं भरीत असे नाव कसे पडले? यामागची रंजक गोष्ट जाणून घेऊ….

वांग्याचे भरीत ही रेसिपी केवळ महाराष्ट्रातच नाही तर पंजाब, आसाम, कर्नाटक, बंगाल, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांतही बनवले जाते. पण, बनवण्याची पद्धत मात्र थोड्याफार फरकाने वेगळी आहे. तसेच काही ठिकाणी त्याचे नावही थोडे वेगळे आहे. पण, भारतात भरीत हा शब्द आला कुठून आणि तो कसा तयार झाला हे आपण ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ….

भरीत शब्द कुठून आला?

कृष्णाकाठची मळीची वांगी जगभरात पोहचली, तरी वांग्याचे चवदार भरीत मात्र आपल्याकडेच होते. पण, आपल्याकडे भरीत आलय ते थेट अरबस्तानामधून. दहाव्या शतकात अब्बासिद घराण्यातला खलिफा हरून अल् रशीदच्या मुलाने वांगे विस्तवावर भाजून एक चटपटीत पदार्थ तयार केला आणि त्याला त्याच्या लाडक्या बेगमच्या बुर्राण या नावावरून नाव दिलं ‘बुर्राणियत.’ हा पदार्थ भारतात आला आणि बुर्राणियत पदार्थाचं नाव झालं भरीत. अशाप्रकारे भारतातील मानला जाणारा हा पदार्थ मूळ भारताचा नाही तर अरबस्तानातील आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरमागरम ज्वारीची भाकरी आणि वांग्याचे भरीत हे शब्द कानांवर जरी पडले तरी तोंडाला पाणी सुटतं. पण, भारतासारख्याच चवीचे वांग्याचे भरीत हे बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातदेखील बनते. यात भारतातील महाराष्ट्राचा विचार केल्यास, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या प्रकारे भरीत बनवले जाते. यातही दोन फरक आहेत, एक म्हणजे कच्चे भरीत आणि दुसरे फोडणीचे भरीत! इतकेच नाही तर वांगं भाजण्यापासून ते बनवण्यापर्यंत वेगवेगळी पद्धत वापरली जाते.