भविष्यात आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण त्यासाठी बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. बचतीसाठी सुरक्षित आणि गॅरंटीड रिटर्नसाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण बहुतांश लोक पोस्ट ऑफिस स्कीम (Saving schemes in post office) अधिक पसंत करतात. कारण पोस्टाच्या स्कीम अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणाऱ्या असतात. परंतु पोस्टाच्या स्कीममध्येही अनेक पर्याय आहेत. जसे की रिकरिंग डिपॉझिट (RD), मंथली इनकम स्कीम (MIS), टाइम डिपॉझिट (TD), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF), सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) इत्यादींचा समावेश आहे. पण गुंतवणूक करण्यापूर्वी बचतीचा कालावधी किती आहे आणि जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसच्या पाच अशा खास योजनांची माहिती घेणे महत्त्वाचे आहे.
१) रिकरिंग डिपॉझिट
पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम पाच वर्षांची आहे, या योजनेतून मिळणारे उत्पन्न अनेकांना फायदेशीर ठरत आहे. रिकरिंग डिपॉझिट ही पिगी बँकेसारखी आहे. ज्यामध्ये पाच वर्षे सतत पैसे जमा केल्यानंतर तुम्हाला तुमचे एकूण जमा केलेले पैसे व्याजासह परत मिळतात. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर ५.८ टक्के वार्षिक व्याज दर लागू आहे.
२) टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिसची टाइम डिपॉझिट स्कीम हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. या योजनेत तुम्ही १, २, ३ आणि ५ वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिट करू शकता. बँकांप्रमाणे पोस्ट ऑफिसदेखील कलम 80C अंतर्गत पाच वर्षांच्या एफडीवर टॅक्सवर सूट देते.
३) मंथली इनकम स्कीम
मंथली इनकम स्कीम (MIS) हा एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो, कारण ती एकरकमी गुंतवणूक करून दरमहा कमाई करते. तसेच जास्त वेटिंग पीरियड कालावधी ठेवण्याची आवश्यकता नाही. ही पाच वर्षांत मॅच्युअर होते. अलीकडेच यावरील व्याजदर ६.६ टक्क्यांवरून ६.७ टक्के करण्यात आले आहे.
४) सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम
जर तुम्ही सीनियर सिटिझन असाल आणि तुम्हाला चांगल्या रिटर्नसह चांगली सेव्हिंग स्कीम हवी असेल, तर पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. या योजनेत फक्त ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोकच गुंतवणूक करू शकतात. यामध्ये ग्राहकांना वर्षाला ७.४ टक्के दराने व्याज मिळत आहे. तसेच इन्कम टॅक्स 1961 च्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूटदेखील दिली जाते.
५) सुकन्या समृद्धी योजना
सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के व्याज दिले जात आहे. एका आर्थिक वर्षात कमाल १.५ लाख रुपये आणि किमान २५० रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेवर वार्षिक कम्पाउंड इंटरेस्ट उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसची ही योजना साडेनऊ वर्षांत म्हणजे ११३ महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करेल. तसेच या योजनेत २१ वर्षांनी गुंतवणूक केल्यानंतर मॅच्युरिटीचा लाभ जोडला जातो.
६) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
यामध्ये गुंतवणूकदार एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये गुंतवू शकतात. तर कमाल १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्यावर दर वर्षी ७.१ टक्के हमी व्याजदर उपलब्ध असतो. त्याची खास गोष्ट म्हणजे आयटी कलम 80 सी अंतर्गत टॅक्स बेनिफिटदेखील उपलब्ध आहे. पीपीएफमध्ये मिळालेले व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम या दोन्हींवर टॅक्स सूट उपलब्ध आहे.