One Peg to Patiala Peg : मद्यपानाबाबत प्रत्येकाची स्वतःची आवड असते. काही लोकांना एका पेग प्यायला तरी तेवढा पुरेसा असतो; तर काहींना पटियाला पेग (साधारण ९० मिली ते १२० मिली मद्य) प्यायल्याशिवाय जमत नाही. प्रत्येक व्यक्ती तिच्या क्षमतेनुसार मद्याचे सेवन करते. आता प्रश्न असा पडतो की, या पेग शब्दाचा अर्थ नक्की काय आणि त्याचे किती प्रकार आहेत? ‘पेग’ हा शब्द तुमच्या आवडत्या मद्याचे मोजमाप करणारे एकक कसे बनले? याबाबत तुम्हाला माहीत नसलेली गोष्ट सांगणार आहोत.
पेग म्हणजे काय?
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, पेग या शब्दाचा अर्थ ‘Precious Evening Glass’ आहे. पेगचे शाब्दिक भाषांतर युनायटेड किंग्डममधील खाण कामगारांच्या जुन्या कथेशी संबंधित आहे. ही वस्तुस्थिती प्रमाणित करण्यासाठी फारसा कागदोपत्री पुरावा नसला तरी असे मानले जाते की, खाण कामगारांनी दिवसभर काम केल्यानंतर त्यांच्या पेयाला ‘Precious Evening Glass’ म्हणजेच ‘संध्याकाळचा मौल्यवान ग्लास’ म्हटले जात असे.
पेगबाबत माहीत नसलेली गोष्ट
टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार पेगची दुर्मीळ कथा युनायटेड किंग्डमची आहे; ज्यामध्ये खाण कामगारांना हाडांना थंडावा देणारी थंडी कमी करण्यासाठी आणि दिवसभर आराम करण्यासाठी ब्रॅण्डीची एक छोटी बाटली देण्यात आली होती. खाण कामगार त्यांच्या ब्रॅण्डीच्या लहान ग्लासचा आनंद घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असल्याने त्यांनी त्याला ‘Precious Evening Glass’, असे म्हटले; ज्याला नंतर पेग, असे संबोधले गेले.
पेग शब्द हा भारतीय संस्कृतीचा भाग कसा बनला आहे?
ब्रिटिश राजवटीत पेये फक्त दोन युनिट्समध्ये मोजली जात होती. लहान पेगसाठी ३० मिली आणि मोठ्या पेगसाठी ६० मिली., असे सोईसाठी वापरले गेले आणि नंतर ते भारतीय मद्यपानाच्या संस्कृतीचा एक भाग बनले. हे विचित्र वाटू शकते; परंतु युनायटेड किंग्डममध्ये मद्य २५ ml साठी सिंगल किंवा ५० ml साठी डबल म्हणून मोजले जाते.
भारत आणि नेपाळमध्ये वापरला जातो पेग हा शब्द
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल; पण मद्य खरेदी करताना किंवा सर्व्ह करताना ‘पेग’ हा शब्द केवळ भारतातच नव्हे, तर नेपाळमध्येही वापरला जातो. तर, जागतिक पातळीवर हीच गोष्ट शॉट्स म्हणून मोजले जातात. सामान्य भारतीयांसाठी, ‘स्मॉल’ किंवा ‘छोटा’ म्हणजे ३० मिली, तर ‘मोठा’ किंवा ‘लार्ज’ ६० मिली, असा अर्थ घेतला जातो. पण, असे काही लोक आहेत; जे एका वेळी ९० मिली किंवा ‘पटियाला पेग’देखील पितात. इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, ‘पेग’ची उत्पत्ती डेन्मार्कमधील ‘paegl’ या मोजमापाच्या एककापासून झाली आहे.
‘इंडिया टुडे’वर प्रकाशित झालेल्या एका लेखात, ‘दादा बार टेंडर’ म्हणून ओळखल्या जाणार्या कॉकटेल इंडिया यूट्युब चॅनेलचे संस्थापक संजय घोष यांनी स्पष्ट केले, “भारत आणि नेपाळमध्ये ‘पेग’ हे मद्य मोजण्यासाठी स्वीकृत युनिट म्हणून निश्चित केले गेले आहे. ‘लहान’ २५ मिली आणि ‘मोठ्या’ ५० मिलीच्या प्रमाणातही मद्य दिले जाऊ शकते; पण ३० मिली आणि ६० मिली का? यामागे एक खूप मनोरंजक कारण त्यांनी सांगितले आहे.
दादा बार टेंडरच्या मते, “३0 मिलिलीटर मद्य ‘स्मॉल’ म्हणून ओळखण्यामागे दोन मोठी कारणे आहेत; जे सर्व्हिंगसाठी सर्वांत लहान युनिट आहे. यामागे आरोग्य हे मुख्य कारण आहे. जेव्हा आपण दारू पितो तेव्हा ते आपल्या शरीरात एखाद्या विषारी घटकासारखे काम करते. त्यामुळे साहजिकच आपले शरीर ते लगेच बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करते. त्यासाठी आपले यकृत आणि इतर अवयव अल्कोहोलचे विविध रसायनांमध्ये विघटन करतात.”
हेही वाचा – बॉक्स ऑफिस कलेक्शन म्हणजे काय? चित्रपटांची कमाई नेमकी कशी मोजली जाते? जाणून घ्या
“दारूचे ३० मिली हे एक आदर्श प्रमाण आहे; जे व्यक्ती हळूहळू पिऊ शकते आणि त्याच्या शरीरासाठी ते पचविणे सोपे होते”, असे दादा बार टेंडर आपल्या निदर्शनास आणतात. “बहुतेक दारूच्या बाटल्या ७५० मिलीच्या असतात. त्यामुळे बार टेंडरला ३० मिली आणि ६० मिलीच्या प्रमाणात दारू देणे सोपे होते. कारण- बाटलीतून किती दारू वापरली गेली आहे हे त्याला सहज कळू शकते. त्याशिवा, अल्कोहोलचे आंतरराष्ट्रीय एकक एक औंस म्हणजे २९.५७ मिली; जे ३० मिलीच्या अगदी जवळ आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
पटियाला पेग म्हणजे काय?
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, असे म्हटले जाते की, पटियालाचे महाराजा भूपेंद्र सिंग यांनी मद्य देण्यासाठी पटियाला पेग हे प्रो-मॅक्स युनिट सुरू केले होते. यामागे अशी कथा प्रसिद्ध आहे की, एकदा भूपेंद्र सिंग यांच्या टीमला आयरिस टीमने त्यांच्याशी स्पर्धा करण्यास सांगितले. घोड्यावर बसून हा खेळ खेळावा लागत असे. पण तो पोलो नव्हता. खेळाचे नाव तंबू पेगिंग असे होते. या खेळात घोड्यावर स्वार झालेल्या खेळाडूला जमिनीवर पडलेल्या लाकडी ठोकळ्याला भाल्याच्या टोकाने मारावे लागते. पटियालाच्या राजाच्या संघाला या खेळाचा अनुभव नव्हता. प्रथमच भूपेंद्र सिंगच्या संघाला पराभवाची भीती वाटत होती कारण आयरीस संघ या खेळात निष्णात होता.त्यामुळे महाराजांनी त्यांचा सामना करण्यासाठी भन्नाट युक्ती वापरली. मॅचच्या आदल्या दिवशी झालेल्या पार्टीत महाराजांनी मोठ्या प्रमाणात दारू पुरवण्याचा आदेश दिला. दुसऱ्या दिवशी जेव्हा आयरिश संघ मैदानात उतरला, तेव्हा मद्यपानामुळे त्यांना हॅंगओव्हर झाला होता आणि अखेर ते सामना हरले. परदेशी पाहुण्यांनी याची तक्रार महाराजांकडे केली. महाराजांनी उत्तर दिले की, “पटियालामध्ये एकाच वेळी इतक्याच प्रमाणात प्रमाणात दारू दिली जाते. त्यानंतर ‘पटियाला पेग’ भारतभर प्रसिद्ध झाला. तज्ज्ञांच्या मते, “पटियाला पेगमध्ये फक्त व्हिस्कीच दिली जाते. भारतात ९० मिली आणि १२० मिली दोन्ही पटियाला पेग म्हणून दिले जातात.”