scorecardresearch

Shiv Jayanti 2023: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा तुमच्या भाषेत समजून घ्या, पाहा नेमका अर्थ

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून या राजमुद्रेचा अर्थ समजून उमजून घ्यायला हवा.

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023

Shiv Jayanti 2023: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तारखेनुसार जयंती आहे. महाराष्ट्राचा ‘जाणता राजा’, अशी ओळख असणारे शिवराय हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. अवघ्या बाराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेण्यापासून ते महाराजांच्या राज्यभिषेकापर्यंत अनेक शत्रूंवर राजांनी मात केली. अफजलखानाचा वध, सिद्दीला चकवा, शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी करणे हे प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

शिवाजी महाराजांच्या कीर्तीचे गुणगान त्यांच्या राजमुद्रेत वर्णिले आहे. महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकाने आजच्या दिवसाचे औचित्य साधून या राजमुद्रेचा अर्थ समजून उमजून घ्यायला हवा.

छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रा

प्रतिपच्चंद्रलेखेव। वर्धिष्णुर्विश्ववंदिता।
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।।

छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रेचा मराठी अर्थ

‘प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृध्दिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे’, असा त्याचा अर्थ. खोल गर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजी राजांचे विचार आणि बुद्धिवैभव सहज लक्षात येते. मुद्रेतला प्रत्येक शब्द विचारपूर्वक मांडण्यात आला होता. त्या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले आहेत. शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्रनिर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू स्पष्ट केला आहे. हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गांजलेल्या, दु:खी, कष्टी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राजमुद्रेचा इंग्रजी अर्थ

The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.

तुम्हा सर्वांना आजच्या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा! छत्रपती शिवाजी महाराज की जय!

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-02-2023 at 09:45 IST

संबंधित बातम्या