मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरु होते. दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण-उत्सवांचा माहोल यानिमित्ताने पुन्हा एकदा सुरु होतो. बहुतांश ठिकाणी स्त्रिया हे गुरुवारचे लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. यावेळी लक्ष्मीची पूजा करुन उपवास करण्याची पद्धत आहे. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्त्व आहे. आता हा महिना आणि त्यातही गुरुवार का महत्त्वाचे हे जाणून घेणे गरजेचे आहे.

– जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

– आंब्याच्या डहाळय़ा, चौरंगावर मांडलेला पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापन केलेली मूर्ती, सजवून केलेली आरास, या व्रताचं महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतिपाठ, आरती, नैवेद्य असे रुप या काळात घराघरांमध्ये पाहायला मिळते.

– कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते. लक्ष्मीला गोडोधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात.

– दर गुरुवारी नेमाने केल्या जाणाऱ्या या पुजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते. या दिवशी हळदीकुंकू देऊन सवाष्णींना फळे तसेच इतर वाण दिले जाते. या महिन्यात मांसाहार वर्ज्य केला जातो.

– मार्गशीर्षांतील गुरुवारची चाहुल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पाच पत्री, पाच फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक वेणी, नारळ आणि यानिमित्ताने घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून गेलेला दिसतो.