What Is Persona Non Grata: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने याला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्करी राजदूतांना पर्सोना नॉन ग्राटा नोटही सोपवण्यात आली आहे.

पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे एखाद्या विशिष्ट देशात राजनयिक किंवा परदेशी व्यक्तीला प्रवेश किंवा राहण्यावर बंदी घालणे. पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्यानंतर आता पाकिस्तानी अधिकाऱ्यांना एका आठवड्यात भारत सोडावा लागणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारने भारतात असेलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्यानंतर सर्वत्र, ‘पर्सोना नॉन ग्राटा’ या वाक्प्रचाराची चर्चा होत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.

पर्सोना नॉन ग्राटा म्हणजे काय?

पर्सोना नॉन ग्राटा हा लॅटिन वाक्प्रचार आहे ज्याचा अर्थ “अनावश्यक व्यक्ती” असा होतो. राजनैतिक भाषेत, पर्सोना नॉन ग्राटा हा वाक्प्रचार हा अशा राजनयिक किंवा परदेशी व्यक्तीला सूचित करतो ज्याला एखाद्या विशिष्ट देशात प्रवेश करण्यास किंवा राहण्यास त्या देशाने मनाई केलेली असते.

डीडब्ल्यूच्या अहवालानुसार, १९६१ च्या राजनैतिक संबंधांसाठीच्या व्हिएन्ना कन्व्हेन्शनमध्ये या पदनामाला राजनयिक अर्थ प्राप्त झाला. कराराच्या कलम ९ मध्ये असे नमूद केले आहे की कोणताही देश, त्यांच्या देशात असलेलेल्या इतर देशांच्या राजनयिक कर्मचाऱ्यांच्या पथकातील कोणत्याही सदस्याला “कोणत्याही वेळी आणि कोणतेही स्पष्टीकरण न देता” पर्सोना नॉन ग्राटा घोषित करू शकतो.

पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्यानंतर लगेचच, संबंधित व्यक्ती सहसा त्याच्या मायदेशी परतते. जर त्याने दिलेल्या मुदतीत देश सोडला नाही तर, तो देश “संबंधित व्यक्तीला मिशनचा सदस्य म्हणून मान्यता देण्यास नकार देऊ शकतो.” कलम ९ मध्ये असेही म्हटले आहे की, एखाद्या व्यक्तीला देशात येण्यापूर्वीच पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले जाऊ शकते.

पर्सोना नॉन ग्राटा कधी वापरला जातो?

व्हिएन्ना कन्व्हेन्शनच्या कलम ९ नुसार एखादा देश परदेशी व्यक्तीला कधी पर्सोना नॉन ग्राटा घोषित करू शकतो याबद्दल कोणतेही निश्चित नियम नाहीत.

ऐतिहासिकदृष्ट्या, इतर देशांच्या कृतींबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी अनेक देशांनी याचा वापर केला असल्याचे पाहायला मिळते. शीतयुद्धादरम्यान, अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने एकमेकांच्या राजदूतांना पर्सोना नॉन ग्राटा घोषित केल्याचे आपण पाहिले आहे.

पाकिस्तान विरोधात पर्सोना नॉन ग्राटाचा वापर

भारताचा विचार केला तर, २०१६ मध्ये दिल्ली पोलिसांनी संरक्षण संबंधित कागदपत्रांसह अटक केल्यानंतर, भारताने पाकिस्तान उच्चायोगाच्या एका कर्मचाऱ्याला हेरगिरीच्या कारवायांसाठी पर्सोना नॉन ग्राटा घोषित केले होते.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री दिल्लीतील पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक पर्सोना नॉन ग्राटा नोट (भारत सोडण्यासाठी औपचारिक पत्र) सोपवली आहे.