शेरवानी, पॅन्ट, शर्ट, जॅकेट किंवा फ्रॉक असो त्याला एक तरी खिसा हा असतोच. सध्या अनेक तरुण मंडळी कपडे विकत घेताना किंवा कपडे शिवून घेताना कपड्यांना आवर्जून खिसा शिवून घेतात. बाहेर फिरायला जाताना किंवा ऑफिसला जाताना सुट्टे पैसे ठेवण्यापासून ते मोबाइल ठेवण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी उपयोगी पडतो तो हा छोटासा खिसाच. फोटो काढताना अलगत या खिश्यात हात ठेवून पोज देत फोटोही काढले जातात.
ड्रेस, कुर्तीबरोबर तर आता साड्यांनासुद्धा खिसे शिवून घेतले जातात. जेणेकरून रुमाल, चावी, पैसे अगदी त्यात व्यवस्थित ठेवता येतात. म्हणजेच पर्स घेण्याचीसुद्धा गरज नसते. त्यामुळे हातातल्या या सगळ्या गरजेच्या वस्तू खिशात अगदीच आरामात राहतात आणि इतर काम करण्यासाठी आपण मोकळे राहतो.
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, खिसा हा शद्ब नेमका कुठून आला असेल? याचा नेमका अर्थ काय? आणि याला खिसा का म्हटले जात असेल? तर आज आपण या लेखातून ‘खिसा’ या शब्दाविषयी अधिक जाणून घेऊ. ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी खिसा या शब्दाचा अर्थ सांगितला आहे.
लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार खिसा हा अस्सल मराठी शब्द आहे. त्याचे मूळ रूप म्हणजे ‘कसा’ असे होय. कसा म्हणजे आजी किंवा महिलांच्या कमरेला पैसे ठेवण्यासाठी असलेली कापडी पिशवी. तसेच हा पुरुषांकडेसुद्धा असतो. पण, त्याला ‘गजवे’ असे म्हटले जाते. काळ बदलला तसे हे शब्दसुद्धा इतिहासात हळूहळू जमा झाले आणि आजीच्या कमरेला असलेला हा ‘कसा’ पुढे चक्क कपड्यांनाच चिकटला आणि त्याला पुढे ‘खिसा’ असे संबोधले जाऊ लागले.
हेही वाचा…तुझं-माझं लगीन लागलं ते बोहल्यावरच! तर ‘बोहलं’ म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या…
तर, या आठवणीतील खिसाने आपल्या सगळ्यांचे बालपण आनंदी केले आहे. लहानपणी घरी आलेल्या पाहुण्यांनी पैसे किंवा खाऊ दिला तर तो आपण या खिशातच लपवून ठेवायचो. तसेच विशिष्ट बिल्ले, चिंचोके, गोट्या, चुरमुरे, फुटाणे, अगदी शेजाऱ्यांच्या झाडाच्या कैऱ्या तोडूनदेखील या छोट्याश्या खिशात आपण सामावून घेतल्या आहेत. आता बालपणीचा तो आनंद हरवला आहे आणि जबाबदारीचं ओझं डोक्यावर आलं आहे; हा खिसा अगदीच सुमार वाटू लागला आहे.