गुलाबाचे फूल हे प्रेम व्यक्त करण्याचे सर्वोत्तम माध्यम मानले जाते. त्यामुळेच व्हॅलेंटाइनच्या दिवशी प्रेमी गुलाब देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. गुलाबाच्या प्रत्येक रंगामागे एक वेगळी भावना दडलेली असते. बऱ्याच काळापासून म्हणजे अगदी आजी-आजोबांच्या काळापासून ते आताच्या तरुणाईपर्यंत गुलाबाचे फूल प्रेमाचे प्रतीक मानले जाते. परंतु, याच गुलाबाबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक आहेत. गुलाब जगात सर्वप्रथम कुठे उगवले? गुलाब किती काळ जगू शकते? जगातील सर्वांत महागडे गुलाब कोणते? त्याविषयी जाणून घेऊ.
सर्वात आधी गुलाब कुठे उगवले?
पुरातत्वशास्त्रज्ञांनी गुलाबाचे जीवाश्म शोधले आहेत, हे जीवाश्म ३५ दशलक्ष वर्षांपूर्वीचे आहेत. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’नुसार, गुलाब ही सजावटीसाठी वापरली जाणारी वनस्पतींची सर्वात जुनी प्रजाती आहे. गुलाब (जिनस रोझा) ही सजावटीच्या उद्देशाने लागवड केलेली आणि वापरली जाणारी वनस्पतींची सर्वात जुनी प्रजाती आहे. इसवी सन ५० मधील काहीकागदपत्रांवरून असे दिसून येते की प्राचीन रोमन लोक औषधी अर्क, स्वयंपाकाचे साहित्य आणि सजावटीसाठी गुलाबांचा उपयोग करत होते. वर्षभर याचा वापर करता यावा म्हणून, ते मोठ्या बागांमध्ये गुलाबाची लागवड करत असे. प्राचीन रोमन इमारती, फर्निचर सजवण्यासाठी लोक गुलाबांचा वापर करत असत, तर गुलाबाचे गालिचे आणि मार्ग तयार करण्यासाठी त्यांच्या पाकळ्यांचा वापर करत असत. चिनी आणि जपानी लोकांनी गुलाबाच्या बागा तयार केल्याचे पाच हजार वर्षांपूर्वीचे पुरावे आढळतात. त्याचप्रमाणे, थियोफ्रास्टस यांनी प्राचीन ग्रीसमध्ये गुलाबांच्या लागवडीबद्दल लिहिले होते, परंतु, या लागवडीचा उद्देश त्यांनी स्पष्ट केला नाही.
गुलाब किती काळ जगू शकतात?
सर्वात जुने आणि जिवंत गुलाब १,००० वर्षे जुने आहे. हे गुलाब जर्मनीतील हिल्डेशिमच्या कॅथेड्रलच्या भिंतीवर उगवते आणि या गुलाब इ.स. ८१५ पासून उगवत असल्याची नोंद सापडते. आख्यायिकेनुसार, या गुलाबाचे झुडूप हिल्डेशिम शहराच्या समृद्धीचे प्रतीक आहे. १९४५ मध्ये बॉम्ब हल्ल्यानंतर कॅथेड्रल नष्ट झाले, मात्र तरीही गुलाबाचे झुडूप टिकून राहिले. गुलाबांचा अन्न आणि औषध म्हणून गगेल्या अनेक काळापासून वापर होत आला आहे. गुलाबांना ‘औषधी वनस्पती’ म्हणूनही वर्गीकृत केले जाते. गुलाबाच्या पाकळ्या खाण्यायोग्य असतात आणि गुलाबजल (पाण्यात पाकळ्या भिजवून तयार केलेले) बहुतेकदा जेली किंवा जॅममध्ये टाकले जाते. तसेच अनेक भारतीय आणि चिनी पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो.
जगातील सर्वात महागडा गुलाब
गुलाब उत्पादक डेव्हिड ऑस्टिन यांनी १५ वर्षांच्या कालावधीत जर्दाळू (एप्रीकॉट) रंगाचा एक करण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्स खर्च केले. २००६ मध्ये चेल्सी फ्लॉवर शोमध्ये ज्युलिएट नावाचा गुलाब आणण्यात आला. हा गुलाबाकडे संपूर्ण जगाला आकर्षित केले. ज्युलियट रोज हा जगातील सर्वात महागडा गुलाब ठरला. अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा हा गुलाब डेव्हिड ऑस्टिन यांनी अनेक गुलाब एकत्र करून तयार केला. त्यांना यासाठी १५ वर्षे लागली. २००६ मध्ये मध्ये त्यांनी हा गुलाब १० मिलियन पाउंड म्हणजेच ९०० कोटी रुपयांना विकला.