Pune : पुण्यातील पुलांचा इतिहास हा कुतूहलाचा विषय आहे. पुण्यातील दारुवाला पूल, मनपा पूल, छत्रपती शिवाजी महाराज पूल, झेड पूल, म्हात्रे पूल, होळकर पूल, बालगंधर्व पूल अशा असंख्य पुलांची नावे तुम्ही अनेकदा ऐकली असेल. प्रत्येक पुलाला एक खास नाव आहे. काही नावं काळानुसार बदलली, तर काही नावं मात्र तशीच आहेत. आज आपण पुण्यातील एका अशा पुलाविषयी जाणून घेणार आहोत, जो एकेकाळी नानासाहेब पेशव्यांनी तातडीने बांधून घेतला होता. हो, लकडी पूल. तुम्हाला माहीत आहे का, नानासाहेब पेशव्यांनी लकडी पूल का घाईघाईने बांधून घेतला होता? लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी ‘नावामागे दडलंय काय?’ या पुस्तकात लकडी पुलाच्या निर्मितीची रंजक गोष्ट सांगितली आहे. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत.

पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव अन् लकडी पुलाची निर्मिती

लकडी पुलाचे आत्ताचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज पूल’आहे, तरी अजूनही पुणेकर या पुलाला ‘लकडी पूल’ म्हणूनच संबोधतात. या पुलाचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पानिपत युद्धाच्या काळात जावे लागेल; कारण त्याच काळात या पुलाची निर्मिती झाली. तो काळ होता १७६१ चा. पानिपतच्या युद्धात मराठा साम्राज्याला मोठा धक्का बसला होता. मराठ्यांनी अशी हार पूर्वी कधीही पाहिली नव्हती. बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशव्यांसाठी तर हा खूप मोठा धक्का होता. युद्धात पराभव झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यातच त्यांनी एक पूल ताबडतोब बांधण्याची आज्ञा दिली होती, तो पूल होता लकडी पूल.

हेही वाचा : Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास

नानासाहेब पेशव्यांनी लकडी पूल घाईघाईने का बांधून घेतला होता?

पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कुंभारवेशीचा एकमेव पूल होता. तिथूनच बहुतेक वेळा विजयी फौजा नगरप्रवेश करीत असत. पानिपतच्या पराभूत फौजेला तिथून न आणता दुसरीकडून आणावे, म्हणून हा नवीन पूल घाईघाईने बांधून घेतला, असे म्हटले जाते. परंतु, याचे विश्वसनीय पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. नानासाहेब खुद्द या पुलाच्या बांधकामाची पाहणी करायचे. पूल पूर्ण होताच २३ जून १७६१ रोजी अवघ्या चाळिसाव्या वर्षी नानासाहेब पेशव्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण, इतक्या तातडीने लाकडाचा पूल बांधण्याची आवश्यकता काय होती, हे रहस्य नानासाहेबांबरोबरच गेले.

या पुलाला लकडी पूल नाव का दिले?

दगडी पूल बांधायचा तर त्याचे काम बराच वेळ चालले असते. म्हणून लाकडी काम करून त्वरित हा लाकडाचा पूल १७६१ ला बांधला गेला. हा पूल लाकडापासून बांधण्यात आला होता, म्हणून या पुलाला लकडी पूल असे नाव पडले. लकडी पूल जेव्हा बांधला तेव्हा तो खूपच अरुंद होता. जवळपास १५ फूट रुंदी असावी. १८४० मध्ये नानासाहेब पेशव्यांनी बांधलेला पूल पडला तेव्हा त्याची पुनर्बांधणी करण्यात आली, तेव्हासुद्धा त्या पुलास लकडी पूल म्हणत असत. इ.स. १९५० ते १९५२ च्या काळात या पुलाचे बांधकाम वाढवून एकूण ७६ फूट रुंदीचा पूल बांधण्यात आला. पुढे पानशेत प्रलयात पुलाचे खूप नुकसान झाले, त्यानंतर पुणे महानगरपालिकेने पुन्हा हा पूल नव्याने बांधला. आज अडीचशे वर्षांनंतरही या पुलाला लोक ‘लकडी पूल’ म्हणूनच ओळखतात.