Interesting Facts About Fruits : बहुतेक कच्च्या फळांचा रंग हा हिरवा असतो. मात्र ते फळं जसजशी पिकायला लागतात तसतसा त्याचा रंग बदलू लागतो. ते फळ पिकल्यानंतर आपोआप तुटून खाली पडते. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की, कच्च्या फळांचा रंग हा नेहमी हिरवाच का असतो आणि पिकल्यानंतर तो रंग का बदलतो? या प्रश्नाचं उत्तर बहुतेकांना ठावूक नसेल, त्यामुळे आम्ही तुम्हाला याचे अचूक वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.
जेव्हा फळ कच्चे असते तेव्हा त्याच्या वरच्या थरात एक क्लोरोप्लास्टचा थर असतो. पण आधी क्लोरोप्लास्ट म्हणजे काय ते जाणून घेऊ. क्लोरोप्लास्ट हे हिरव्या वनस्पती पेशी असतात, ज्यामध्ये क्लोरोफिल असते. जे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत करते. यामुळे कच्ची फळे हिरवी दिसतात. झाडाच्या फांद्यावरील फळ हिरवे असते याचा अर्थ ते फळ सूर्यप्रकाशापासून अन्न ग्रहण करत असते. म्हणजेच सध्या ते फळ खाण्यासाठी तयार नसून पिकत असते.
हेही वाचा : डॉक्टरांच्या खराब अक्षरातील प्रिस्क्रीप्शनमुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू? अनेक अहवाल काय सांगतात, वाचा
फळाचा रंग कसा बदलतो?
हिरव्या फळातील क्लोरोप्लास्ट हळूहळू क्रोमोप्लास्ट मध्ये बदलते. यामुळे फळाचा रंगही बदलू लागतो आणि बहुतांश घटनांमध्ये फळ लाल होते. फळ पिकणे ही रासायनिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान फळाची चव, रंग, सुगंध अशा अनेक गोष्टी बदलतात. या प्रक्रियेदरम्यान फळांच्या स्टार्चचे साखरेत रुपांतर होते. क्लोरोप्लास्ट जसेजसे कमी होते तसा फळांचा हिरवा रंगही कमी होतो. फळ पिकण्याच्या प्रक्रियेत नवीन रंगद्रव्ये देखील तयार होत असतात. इथिलीन हार्मोन फळ पिकण्याच्या प्रक्रियेला गती देते.
सोप्या भाषेत सांगायचे तर, सूर्यप्रकाशातून अन्न ग्रहन करून विकसित होत असेपर्यंत फळ हिरवे राहते. पूर्ण विकसित झाल्यानंतर फळ अन्न ग्रहण करणे थांबवतो. त्यामुळे त्याचा रंगही बदलू लागतो. हेच तत्व शेतात डोलणाऱ्या झाडांच्या पानांमध्ये आणि पिकांमध्ये काम करते.