scorecardresearch

National Science Day: भारतामध्ये २८ फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’, कोण होते सी.व्ही.रामण?

१९८६ पासून भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जात आहे.

national science day 2023
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

National Science Day 2023: भारतामध्ये अनेक थोर विद्वान संशोधक, शास्त्रज्ञ होऊन गेले आहेत. या शास्त्रज्ञांमध्ये सी.व्ही.रामण हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. त्यांनी भौतिकशास्त्रामध्ये खूप संशोधन केले आहे. त्यांच्या रामण इफेक्ट या संशोधनाला नोबेल पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी शोधून काढलेल्या सिद्धान्ताचा वापर आजच्या अनेक प्रयोगांमध्ये केला जातो. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

संशोधनाची आवड असणाऱ्या रामण यांचा जन्म तेव्हाच्या मद्रास प्रांतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा वारसा होता. याच वातावरणाचा फायदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला. अवघ्या १६ व्या वर्षी पदवी आणि १८ व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन त्यांनी पहिला शोध निबंध (Research paper) प्रसिद्ध केला. पुढे काही काळ सरकारी नोकरी केली. तेव्हा कामकाज संपवून ते अन्य संशोधनावर अभ्यास करत असत. थोड्याच कालावधीमध्ये त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचे संशोधन सातासमुद्रापार गेले.

सुरुवातीला शिक्षणासाठी त्यांना परदेशी जायचे होते, पण शारीरिक स्वास्थ बिघडल्याने त्यांने ते शक्य झाले नाही. पुढे दहा-बारा वर्षांनी त्यांना परदेशवारीचा योग आला. या समुद्री प्रवासादरम्यान त्यांना आकाश आणि समुद्र यांचा रंग निळा का असतो असा प्रश्न पडला. त्यावरुन संशोधन करत रामण यांनी रामण इफेक्ट हा सिद्धान्त जगासमोर मांडला. निळ्या रंगाचे कारण समजून घेण्यासाठी त्यांनी पारदर्शक पृष्ठभाग, बर्फाचे तुकडे आणि प्रकाश यांच्यासोबत विविध प्रयोग केले. विज्ञान क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षात घेऊन, १९८६ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने त्यांच्या कार्याला अभिवादन करत २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

आणखी वाचा – National Science Day 2023: आकाशाचा रंग निळाच का असतो? या प्रश्नाने भारताला मिळालं भौतिकशास्त्रातील पहिलं नोबेल

सी.व्ही. रामण यांनी भारतीय वाद्यांवरही संशोधन केले होते. १९२९ मध्ये त्यांना ‘सर’ हा किताब देण्यात आला, १९३० मध्ये रॉयल सोसायटीतर्फे दिले जाणारे ‘हायग्रेझ पदक’, १९५१ साली फिलाडेल्फिया विद्यापीठाचे ‘फ्रँकँलिन पदक’, १९५४ साली ‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आणि १९५७ मध्ये ‘लेनिन’ पारितोषिक अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 10:17 IST
ताज्या बातम्या