scorecardresearch

National Science Day 2023: आकाशाचा रंग निळाच का असतो? या प्रश्नाने भारताला मिळालं भौतिकशास्त्रातील पहिलं नोबेल

एका साध्या प्रश्नामुळे सी.व्ही.रामण हे जगभरात कसे प्रसिद्ध झाले हे जाणून घेऊयात…

raman effect cv raman
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

National Science Day Special: महान शास्त्रज्ञ न्यूटन एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता. त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडलं. तेव्हा त्याला सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही? असा प्रश्न पडला. या प्रश्नानेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. ज्यांना प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करतात, ते लोक इतिहास घडवतात असे म्हटले जाते. असाच प्रश्न भौतिकशास्त्राचे अध्यापक प्रो.सी.व्ही.रामण यांना पडला होता. १९२१-२२ च्या आसपास ते कामानिमित्त इंग्लंडला गेले होते. तेथून भारतात परत येताना त्यांना आभाळाचा रंग हा निळाच का असतो असा प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर शोधून त्यांनी ‘रामण इफेक्ट’ (Raman Effect) हा सिद्धान्त मांडला. त्यांच्या या शोधाची दखल जगाने घेतली. पुढे १९३० मध्ये त्यांना या सिद्धान्तासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८६ मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारने सी.व्ही. रामण आणि त्यांच्या अमूल्य योगदानाला अभिवादन म्हणून २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.

आकाश निळ्या रंगाचं का असतं?

सूर्याची किरणे पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करताना ती विखुरली जातात. पृथ्वीच्या वातावरणातील थर आणि त्यातील वायू, कण यांच्याद्वारे एकाप्रकारे त्यांचे विभाजन होते. किरणांमुळे तयार होणाऱ्या रंगांमध्ये निळ्या रंगाचा देखील समावेश असतो. निळा रंगाची किरणे ही लहान लहान लहरीमार्फत वातावरणामध्ये पुढे प्रवास करत असतात. त्यामुळे निळा रंग इतर रंगांपेक्षा अधिक विखुरला जातो आणि परिणामी आकाश प्रामुख्याने निळे दिसते. हे सर्व कसे आणि का घडते यावर सी.व्ही. रामण यांनी अभ्यास केला. त्यांतून रामण एफेक्टचा उदय झाला. याच सिद्दान्तामुळे आभाळाप्रमाणे समुद्रदेखील निळ्या रंगाचा दिसतो.

National Science Day: भारतामध्ये २८ फेब्रुवारी रोजी का साजरा केला जातो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’, कोण होते सी.व्ही.रामण?

कोण आहेत सी.व्ही. रामण?

सी.व्ही.रामण यांचा जन्म तेव्हाच्या मद्रास प्रेसिडेन्सीमधील त्रिची (सध्याचे तिरुचिरापल्ली) येथे झाला. अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी पदवी मिळवली. पुढे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन त्यांनी कोलकातामध्ये नोकरी स्विकारली. नोकरी करत असतानाच ते इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (IACS) येथे संशोधनाचे कार्य सुरु ठेवले. अवघ्या काही वर्षांमध्ये त्यांच्या संशोधनाची किर्ती भारत आणि भारताबाहेर पसरली. काही कामासाठी ते इंग्लंडला गेले होते. या समुद्री प्रवासादरम्यान त्यांना समुद्र आणि आभाळ निळ्या रंगाचे का असते हा प्रश्न पडला. मायदेशी परतल्यावर त्यांनी या मुद्द्यावर संशोधन करत रामण इफेक्ट जगासमोर मांडला.

रामण इफेक्टचा सिद्धान्त का सांगतो?

प्रकाश एखाद्या वस्तूवर पडल्यावर त्याची किरणे परावर्तित, अपवर्तिक किंवा त्या वस्तूमधून प्रसारित होतात. जेव्हा प्रकाशाची किरण एखाद्या द्रव स्थिती असलेल्या पदार्थातून जातो तेव्हा त्यातील किरणे विखुरतात. या विखुरलेल्या किरणाचा एक अंश वेगळ्या रंगाचा असतो. प्रकाश वातावरणातील रेणूंमुळे विचलित होतो, त्यावेळी त्याची तरंगलांबी (Wavelength) बदलल्यामुळे रंग बदलतात. रेणूंच्या कंपनामुळे प्रकाशाच्या ऊर्जेमध्ये बदल झाल्याने त्याची तरंगलांबी (Wavelength) बदलते असे रामण इफेक्ट सांगतो.

मराठीतील सर्व FYI ( Do-you-know ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 09:39 IST
ताज्या बातम्या