सध्या सिंहस्थ कुंभमेळा सुरू आहे. त्यात शाही स्नानासाठी देशभरातील साधू-संत, महंत नाशिक-त्र्यंबकेश्वरला डेरेदाखल झाले आहेत. पर्वणीच्या काळात त्यांचे शाही स्नान असते. तद्वत आगामी सणासुदीचा हंगाम आता वाहनप्रेमींसाठी पर्वणीचा ठरणार आहे. विविध गाडय़ांचे सादरीकरण या काळात होणार आहे आणि त्यामुळे ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत..
जगातील पाचवी मोठी वाहन बाजारपेठ असलेला भारत सध्या वाढत्या महागाईबरोबरच तीव्र दुष्काळाचा सामना करत आहे. तेव्हा यंदा कमी झालेल्या पाऊस-पिकाच्या जोरावर खरेदीदारांमध्ये तरी वाहन खरेदीसाठी फारसा उत्साह दिसत नाही. जुलै-ऑगस्टमध्ये वाहनांच्या विक्रीत लक्षणीय अशी वाढ नोंदलीच गेली नाही. यंदाचा सण मात्र लाभदायी ठरण्याचा विश्वास या क्षेत्रात आहे.
सरकारकडून अर्थव्यवस्थेतील सुधाराची अपेक्षा तमाम उद्योग जगताने धरली असतानाच यंदाच्या सणांपासून उत्साहवर्धक वातावरणाचे मनसुबे वाहन क्षेत्राने रचले आहेत. परिणामी यंदाच्या सणांच्या मोसमात १५ टक्केपर्यंत वाहन विक्रीची आशा वाहन निर्मात्यांना आहे. प्रत्यक्षात या क्षेत्राची वाढ अशी दुहेरी आकडय़ांत झाली तर ती गेल्या अनेक वर्षांनंतरची मोठी वाढ ठरेल. वाहन कंपन्यांसाठी वर्षांतील गुढीपाडवा आणि दसरा हे दोन मोठे मुहूर्त महत्त्वाचे असतात. गृहनिर्माण क्षेत्राप्रमाणेच या कालावधीत उत्पादनाला ग्राहकाकडून अधिक मागणी असते. वाहन कंपन्या मिळवीत असलेल्या एकूण व्यवसायापैकी ३० टक्के हा याच दरम्यान असतो. तुलनेत जानेवारीपासूच अनेक कंपन्यांनी त्यांची नवी वाहने बाजारपेठेत सादर केली आहे.
आता तर गणेशोत्सवापासून सणांना प्रारंभ होणार आहे तो थेट दिवाळीपर्यंत सुरू राहील. सणासुदीच्या तोंडावर १६हून अधिक वाहने खरेदीदारांसाठी सज्ज आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या ओणमपासूनच यंदाच्या सणांच्या हंगामाला सुरुवात झाली असली तरी खरा जोर येईल गणेशोत्सवापासून.
विक्रीबाबत वाहन क्षेत्राने अद्याप लक्षणीय फेर धरला नसला तरी येणारा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा व दिवाळीकडून वाहन उत्पादन कंपन्यांना मोठी आशा आहे. मोठय़ा प्रमाणात आयातीवर निर्भर असलेल्या वाहन क्षेत्राने अद्याप चलनातील अस्थिरतेचा परिणाम वाहन खरेदीदारांपर्यंत पोहोचविलेला नाही. इंधनाच्या कमी झालेल्या भावांना आता व्याजदर कपातीची साथ मिळाली तर यंदाच्या सणांमध्ये भारतीय वाहन व्यवसाय तरून जाईल.
आगामी आकर्षण!
टाटा काईट :
नॅनो, झेस्ट आणि बोल्ट या तीन विविध गटांतील मर्यादित स्थान राखणाऱ्या टाटा मोटर्सच्या काईटची प्रतीक्षा आहेच. हॅचबॅक श्रेणीतील तिचे हे नवे वाहन कितपत अपेक्षा पूर्ण करते हे पाहावे लागेल.
रेनो क्विड :
कंपनीची डस्टर सध्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात अद्यापही धुमाकूळ घालते आहे. याच गटातील तिची नवी क्विड तमाम वाहनप्रेमींसाठी उत्सुकतेची ठरणार आहे. एकीकडे निस्सानबरोबर स्पर्धा करणाऱ्या रेनोने या वाहननिर्मितीसाठी व्यावसायिक भागीदारी केली आहे.
ऑडी क्यू७ :
महागडय़ा एसयूव्ही प्रकारातील हे वाहन येत्या नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
शेव्हर्ले ट्रेलब्लेझर :
प्रीमियम गटातील एसयूव्हीची प्रतीक्षा आहेच. जुलैमध्ये तिचे निवडक रूप पाहायला मिळाले होते. यंदा ती प्रत्यक्षात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
मारुती स्विफ्ट एसपी :
मारुतीने या वर्षांत केवळ तिच्या एस क्रॉस या एकाच वाहनाद्वारे हालचाल नोंदवली. तिला ऑगस्टमध्ये तुलनेत तसा बरा प्रतिसादही मिळाला. कंपनी तिची यापूर्वीचीच स्विफ्ट ही कार एसपी या विस्तारित नावाने बाजारात आणत आहे. बाकी मारुतीमध्ये यंदाच्या सणांत विशेष असे काही नाही.
फोर्ड फिगो :
फिगो केव्हाच बंद झाली आहे. तिची याच-हॅचबॅक श्रेणीतील नवी फिगो यंदाच्या हंगामात असेल. शिवाय फिगो एस्पायर ही नवी सेदान आहेच.तील हे वाहन येत्या नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
होण्डा :
अमेझ व मोबिलिओच्या नव्या श्रेणी नुकत्याच दाखल केल्या आहेत. या दोन्ही वाहनांना मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेत कंपनीने तिच्या मर्यादित श्रेणी सादर केल्या आहेत.
ह्य़ुंदाई एलाईट आय२० :
ही कार भारतीय रस्त्यांवर येऊन वर्ष पूर्ण झाले. याच निमित्ताने तिची मर्यादित श्रेणी ही स्पोर्ट गटातील वाहन प्रकारात येत आहे. एमपीव्ही क्रेटाचे आगमन ताजे असतानाच हॅचबॅक प्रकारावरही कोरियन कंपनीचे विशेष लक्ष राहणार आहे.
बीएमडब्ल्यू ३ :
३ सीरिजमध्ये काही निवडक बदल करून सादर करण्यात आलेली ही प्रीमियम गटातील कार दिवाळीत अवतरेल.
फियाट अबार्थ पुंटो इव्हो : या श्रेणीत फारसे यश न मिळाल्यानंतरही अबार्थ पुंटो इव्हो हे नवे नाव येत्या काही दिवसांत १० लाख रुपयांत आढळेल.
दुचाकीमध्ये इटलीच्या पिआज्जिओने तिची प्रीमियम स्कूटर गटातील व्हेस्पाचे नवे रूपडे नुकतेच सादर केले. दुचाकीमध्ये यंदा हिरो (झेडआयआर, डॅश, डेअर१२५), होण्डा (पीसीएक्स१५०), टीव्हीएस (ग्राफिटी) अशा निवडक कंपन्याच यंदाच्या सणांमध्ये भाग घेत आहेत. तर मिनी ट्रक, अवजड वाहने आदी वाणिज्यिक वाहन प्रकारांतही यंदा विशेष अशी नवी उत्पादने उल्लेखनीय नाहीत. छोटय़ा गटातील व्यापारी वाहनांमधील टाटा मोटर्स, महिंद्रा, अशोक लेलॅण्ड, पिआज्जिओ स्पर्धा सणांमध्येही कायम राहणार आहे.
महिंद्रा अॅण्ड महिंद्राची टीयूव्ही३०० यंदाचा सण वाहन बाजारपेठेसाठी ‘रिमार्केबल’ ठरविण्याची अटकळ आहे. कंपनीने या वाहनासाठीचा सप्टेंबर मध्यचा मुहूर्त कधीच जाहीर केला आहे. एक्सयूव्ही५०० ला मिळालेले घवघवीत यश कंपनी नव्या वाहन प्रकारातही सोबत राखेल. कॉम्पॅक एसयूव्ही प्रकारात महिंद्रा यामार्फत प्रथमच उडी घेणार आहे. महिंद्रा काहीशी उशिराने या गटात उतरत आहे. मात्र तिचा एसयूव्हीतील वरचष्मा पाहता हे वाहन कंपनीसाठी नवा इतिहास रचेल, अशी चिन्हे आहेत.
वीरेंद्र तळेगावकर – veerendra.talegaonkar@expressindia.com