होंडा ही वाहन उद्योग क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी गणली जाते. त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने मिळवलेले यश व त्यानंतर काही कंपन्यांनी त्याच धर्तीवर काढलेल्या तशाच स्वरूपाच्या गाडय़ा यावरून बरेच काही लक्षात येण्यासारखे आहे, पण या स्कूटर्स फार पेट्रोल खाणाऱ्या आहेत. मोटरसायकलच्या तुलनेत ते लगेच जाणवते. त्यामुळे खरेतर चांगले अ‍ॅव्हरेज देणारी स्कूटर गरजेची आहे. तुलनेने बाजारातील कुठल्याच कंपनीच्या स्कूटरचे अ‍ॅव्हरेज हे फारसे नाही, तसेच या स्कूटर्सच्या किमतीही जास्त आहेत. चालवण्यास सोप्या असल्या तरी त्या पेट्रोलचे वाढते दर पाहता परवडणाऱ्या नाहीत. होंडाने ११० सीसी गटात ड्रीम निओ ही गाडी आणली, पण १५० सीसी गटाकडे दुर्लक्ष करता येत नाही. आता होंडाने सीबी ट्रिगर ही गाडी म्हणजे नवीन बाईक बाजारात आणली आहे. भारतीय दुचाकी स्वयंचलित वाहनात १५० सीसी गाडय़ांचे प्रमाण १० टक्के आहे. सध्या या गटात बजाज कंपनीचे वर्चस्व आहे. होंडाने यापूर्वी सीबी युनिकॉर्न ही गाडी आणली होती व त्यानंतर सीबीआर १५० आर ही गाडी मोटरसायकलिंगची मजा अनुभवणाऱ्यांसाठी चांगलीच होती. आता त्यांनी १८-२४ या वयोगटासाठी सीबी-ट्रिगर ही गाडी आणली आहे. त्यात मोटर सायकलिंगची मजाही आहे शिवाय ज्यांना रोजच्या वापरासाठी हवी आहे त्यांनाही ती उपयुक्त आहे. काळ्या रंगाची अ‍ॅलॉय व्हील म्हणजे चाके. मागील एलईडी लाइट, सशक्त अशी बांधणी ही या गाडीची खास वैशिष्टय़े सांगता येतील. कॉम्बी ब्रेक सिस्टीम असल्याने ती फायद्याची आहे. नेहमीच्या ब्रेकिंग अंतराच्या ३२ टक्के इतका फरक यात दिसतो. म्हणजे थोडय़ा अंतरावरूनही तुम्ही ब्रेक लावून गाडी लगेच थांबवू शकता. मोनो सस्पेन्शन असल्याने गाडीचे सगळे वजन मध्यावर केंद्रित आहे त्यामुळे ती समतोल आहे. गाडी कमी वेगाने चालवली तर तिचे अ‍ॅव्हरेज कमी मिळते, पण या गाडीच्या बाबतीत त्यावरही मात करण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च वेगात व मध्यम वेगात गाडीचे अ‍ॅव्हरेज चांगले आहे. तिचे इंजिन दीडशे सीसीचे आहे. त्याची क्षमता १२.५ न्यूटनमीटर म्हणजे १४ बीएचपी इतकी आहे. एक लिटरला गाडी ६० किलोमीटर इतके अ‍ॅव्हरेज देईल असा कंपनीचा दावा आहे. गाडीचे सीट म्हणजे आसन हे चालकासाठी आरामदायी व रुंद आहे पण खूप लांब नाही. वजनाला तुलनेने हलकी असलेली डायमंड फ्रेमची ही गाडी हाताळण्यास सोपी आहे. तिचे ब्रेक हे तिचे बलस्थान आहे. पुढचा २४० मि.मी. व मागचा २२० मि.मी. दुहेरी  डिस्क ब्रेक हा चालकाला गाडीचे जास्त नियंत्रण करण्याची संधी देतो. रुंद टय़ूबलेस टायर, निगा-दुरुस्तीची फारशी गरज नसलेली बॅटरी, व्हिस्कल एअर फिल्टर ही गाडीची इतर वैशिष्टय़े आहेत. गाडीची एक्स शो रूम किंमत दिल्लीत ६७,४३३ रुपये आहे. थोडक्यात सीबी ट्रिगर या गाडीची किंमत स्पर्धात्मक आहे. रोजच्या वापराला तसेच बाइकची आवड असणाऱ्यांना ही गाडी योग्य आहे. मिटिऑर ग्रीन मेटॉलिक, पर्ल सियना रेड व ब्लॅक (काळा रंग) अशा अनेक रंगसंगतीत ही गाडी उपलब्ध आहे.