कॅलिफोर्निया राज्यातील सान बर्नाडिनो येथे १४ जणांचे हत्याकांड हा इस्लामी दहशतवादच, अशी खात्री पटू लागली असताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेले भाषण मुत्सद्देगिरीची चमक दाखविणारे आहे. औपचारिकपणे आणि शनिवारी संध्याकाळसारख्या अगदी मोक्याच्या वेळी चित्रवाणीवरून प्रसारित झालेल्या या १३ मिनिटांच्या भाषणात काहीच नवीन काहीच नव्हते, ही टीका वरवरची किंवा उथळ आहे. हत्याकांड घडविणाऱ्या जोडप्यातील महिलेने ‘इस्लामिक स्टेट’च्या संपर्कात असल्याचा मजकूर फेसबुकवर आदल्याच दिवशी लिहिला होता हे उघड झाल्यानंतर, आयसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया – किंवा अमेरिकी रूढ लघुरूप ‘इसिल’- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेवान्त) चा प्रवेश अमेरिकेत झाला की कसे, हे अमेरिकी तपासयंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. तपासाच्या मधल्या टप्प्यावर ओबामांनी केलेल्या भाषणात, हत्याकांड घडविणाऱ्यांना इस्लामी दहशतवादी ठरवून टाकणे आत्ताच शक्य नाही याची जाणीव ठेवलेली होती. ते इस्लामी दहशतवादी असले अथवा नसले, तरी तशा दहशतवादी विचारांचा पगडा त्यांच्यावर होता, त्यांच्या विचारांचे ‘विखारीकरण’ झालेले होते हे खरे, एवढेच ओबामा म्हणाले आणि यावर उपाय काय, हे सांगू लागले.
या उपायांचे दोन भाग ओबामांनी केले. पहिला भाग आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आणि प्रत्यक्ष दहशतवादय़ांना संपविण्याचा, तर दुसरा देशांतर्गत. सीरियात अमेरिकी सैनिक पाठविण्याऐवजी तिथे असलेल्या आणि आयसिसविरुद्ध लढणाऱ्यांना प्रशिक्षण आणि तांत्रिक मदत देण्याचे धोरणच अमेरिका कायम राखील असे पहिल्या भागातून स्पष्ट झाले. अमेरिकी सैनिक परभूमीवर गुंतून पडणे हेच आयसिसला हवे आहे, असा इशारा ओबामांनी जाहीरपणे दिला त्याचा रोख मात्र अमेरिकेतील युद्धखोरांवर आणि टीकाकारांवर होता. दहशतवादाचा बीमोड करूच, पण अमेरिकनांनी इस्लामशी आपला लढा नसून दहशतवादाशी आहे हेही ओळखले पाहिजे, असा आग्रह ओबामांनी मांडलाच. शिवाय, विखारीकरण रोखण्यासाठी काय केले पाहिजे, याचीही रूपरेषा दिली. ‘आयसिस’सारख्या अल-काइदाप्रणीत गटांची विखारी विचारधारा नाकारलीच पाहिजे, इस्लामी विद्वानांनी केवळ हिंसक घटनांचा निषेध करण्यावर न थांबता इस्लामचे जे विरूपीकरण या गटांनी चालविले आहे त्याचा विरोधही करत राहिले पाहिजे. धर्मसहिष्णुता, परस्परांचा आदर आणि मानवप्रतिष्ठा या तत्त्वांविरुद्ध इस्लाम कधीच नाही, हे दाखवून दिले पाहिजे, असे ओबामा म्हणाले. हे जगभरच्या मुस्लिमांचे काम आहेच, परंतु मुस्लिमांबाबत अमेरिकेत तरी भेदभाव कधीही केला जाणार नाही याची खात्री देणे सर्व अमेरिकनांचे काम आहे, असे ओबामांचे म्हणणे आहे.
इस्लामविरोध, मुस्लिमद्वेष आणि दहशतवादास विरोध यांत फरक आहे. ओबामांनी अमेरिकनांचा विरोध फक्त दहशतवादालाच राहील, याची जाहीर ग्वाही देताना जगभरच्या मुस्लिमांना आवाहन करण्याखेरीज अमेरिकनांनाही समता पाळण्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. हा समतोल यापूर्वी जर्मनीच्या अँगेला मर्केल यांनी साधला होता. जर्मनीत कुर्द आणि अन्य निर्वासितांना आश्रय देतानाच, मुस्लिमद्वेष वाढणार नाही हे मर्केल यांनी स्पष्ट केले होते. ती समतोल साधण्याची लढाई आपणही लढतोच आहोत, हे ओबामांनीही आता जाहीर केले आहे.