काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी केली असतानाच आता संजय निरुपम यांनी नरेंद्र मोदी हे औरंगजेब याचा आधुनिक अवतार असल्याचे म्हटले आहे. भाजपा नेते प्रचारात दररोज खोटे दावे करतात, असेही निरुपम यांनी म्हटले आहे.
संजय निरुपम हे मंगळवारी वाराणसीत होते. नरेंद्र मोदींवर टीका करताना संजय निरुपम म्हणाले, वाराणसीच्या लोकांनी ज्या व्यक्तीला निवडून दिले, तो व्यक्ती औरंगजेब याचा आधुनिक अवतार आहे. वाराणसीत महामार्गासाठी शेकडो मंदिरं पाडण्यात आली. विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपये इतके शुल्क आकारले जाते. यावरुन एक स्पष्ट होते की जे औरंगजेब करु शकला नाही ते नरेंद्र मोदी करु शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दुर्योधनाशी करणे योग्यच आहे, असेही त्यांनी सांगितले. मी तर मोदींना औरंगजेब म्हणतो. रावण आणि दुर्योधन इतकाच अहंकार मोदींमध्ये देखील आहे. प्रियंका गांधी यांनी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला की, दुर्योधन आणि रावणाचेही गर्वहरण झाले होते, मग मोदींच्या बाबतही हे शक्य आहे, असे सांगत निरुपम यांनी प्रियंका गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले.
#WATCH Sanjay Nirupam, Congress, in Varanasi: I feel that the person that people here have chosen- that Narendra Modi is actually the modern incarnation of Aurangzeb. (07.05.2019) pic.twitter.com/u6x0UsgU3D
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 8, 2019
माहिती अधिकाराअंतर्गत यूपीए सरकारच्या काळात सर्जिकल स्ट्राइक झालेच नव्हते, अशी माहिती समोर आली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता संजय निरुपम संतापले. भाजपाने हा खोटा प्रचार केला असून यूपीए सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राइकबाबत सैन्यातील अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे, असा दावा त्यांनी केला.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी मोदींनी अपशब्दांचा वापर केला त्याच दिवशी अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव निश्चित झाला. जर भाजपाने राजीव गांधी यांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली तर भाजपाचाच पराभव होईल, असे ते म्हणालेत.