काँग्रेस सध्या सहा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा करत आहे. अशा कोणत्या स्ट्राइक केल्या ज्या ना दहशतवाद्यांना माहिती आहेत, ना पाकिस्तानला, ना भारतीयांना. आधीच त्यांनी टीका केली, नंतर त्यांनी निदर्शनं केली आणि आता ‘मी टू मी टू’ करत आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. राजस्थानमधील सिकर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. 23 मे नंतर काँग्रेस 600 वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा करेल अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

काँग्रेसने आपण सहा सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या दावा केला असून यावर बोलताना नरेंद्र मोदींनी सांगितलं की, ‘जेव्हा कागदावरच करायची असेल, व्हिडीओ गेममध्येच करायची असेल तर मग सहा असोत किंवा तीन, 20 असोत किंवा 25….या खोट्या लोकांना काय फरक पडतो’.

‘आपले जवान दहशतवाद्यांना घरात घुसून मारत असताना काँग्रेस नेते दहशतवाद्यांचा मृतदेह दाखवा अशी मागणी करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी आपल्या वीर जवानांचं शौर्य दाखवत नाही. मतदारांना चार टप्प्यातील मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला आहे’, असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं.

‘काल काँग्रेसच्या नामदारांनी आपला रिमोट कंट्रोल सुरु केला आणि त्यानंतर काहीच वेळात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने आमच्यावेळी अनेकदा सर्जिकल स्ट्राइक केला होता असं वक्तव्य केलं’, असं नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांचं नाव न घेता सांगितलं. यानंतर काही वेळातच काँग्रेसचे सर्व नेते उड्या मारु लागले. हेच तर काँग्रेसला हवं होतं असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं.

‘आता काँग्रेस आपण सर्जिकल स्ट्राइक केला होता हे सिद्ध करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. एसी रुममध्ये बसून कागदावर सर्जिकल स्ट्राइक करण्याचं काम काँग्रेस सरकारच करु शकतं’, असा टोला यावेळी नरेंद्र मोदींनी लगावला. काँग्रेस सर्जिकल स्ट्राइक म्हणजे एक व्हिडीओ गेम समजून आनंद घेत असावं असंही नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.