लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने ईशान्य मुंबई मतदारसंघातून विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान यावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका करत ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मोदींविरोधात आघाडी करावी आणि मोदींना धडा शिकवावा असं आवाहन केलं आहे. शिवसेनेच्या हट्टापायी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबलाय असंही त्यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त करत टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘शिवसेनेच्या हट्टापायी भाजपने किरीट सोमय्यांच्या स्वप्नांचा गळा दाबलाय. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या स्वप्नांचाही भाजपने असाच चुराडा केलाय. ‘तिकीट वंचित आघाडी’च्या बॅनरखाली या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मोदींविरोधात आघाडी करावी आणि मोदींना धडा शिकवावा’.

किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्यं केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात किरीट सोमय्या यांना भाजपची उमेदवारी मिळण्यावरून शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्यासह काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाहीर टीका करत सोमय्या यांना आव्हान देण्याची भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तर राऊत यांच्या विधानावर भाष्य करण्याची गरज नाही, असे सांगत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी या वादाला फारसे महत्त्व देत नसल्याचे संकेत दिले होते.

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर किरीट सोमय्या हे नार्वेकर यांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्यावेळी निरोप घेताना उद्धव ठाकरे यांच्या भेटीची इच्छा सोमय्या यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर संजय राऊत यांच्या भेटीचा प्रयत्न झाला पण ती भेट होऊ शकली नव्हती. मात्र, उद्धव यांना भेटण्यासाठी औपचारिकपणे सोमय्या यांनी मातोश्रीवर विचारणा केली नव्हती, असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.