पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल करत आपल्याला धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. ‘ममतादीदी धमकी देत आहेत. आज सकाळी त्यांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. बुधवारी ममतादीदी भाजपाचं कार्यालय ताब्यात घेणार असं बोलत असल्याचं मी मीडियामध्ये पाहिलं’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, ‘येथे दुर्गा पुजा आणि सरस्वती पुजेसंबंधी समस्या आहेत. जय श्री राम बोलणंही गुन्हा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बंगालमधील लोकांना या गोष्टींचा त्रास होत आहे. पण हे मुद्दे राष्ट्रीय स्तरावर कोणी आणले ? आज कोणता पक्ष बंगालचा आवाज झाला आहे ? भाजपा’.

‘तृणमूल काँग्रेसचे गुंड हिंसाचार पसरवत आहेत. त्यांनी विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. सीसीटीव्ही कॅमेरे तिथे होते. ज्याप्रकारे राज्य सरकारने नारदा आणि शारदा घोटाळ्याचे पुरावे नष्ट केले, त्याचप्रकारे या घटनेचे पुरावे नष्ट केले जात आहेत. जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात आली पाहिजे अशी मागणी मी करतो’, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

मोदी आरोप सिद्ध करून शकले नाहीत तर त्यांना तुरुंगात धाडेन-ममता
नरेंद्र मोदी तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडल्याचा आरोप करत आहेत. हा आरोप सिद्ध झाला नाही तर मोदी जनतेसमोर उठाबशा काढणार का? त्यांनी उठाबशा काढल्या नाहीत तर मी त्यांना तुरुंगात धाडेन असाही इशारा ममता बॅनर्जींनी दिला. २०० वर्षांपासूनचा वारसा मोदी परत करू शकतात का? असेही ममता बॅनर्जींनी विचारले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटं बोलत आहेत असाही आरोप ममता बॅनर्जींनी केला आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर तुम्ही आरोप केले आहेत ते ठीक आहे. आरोप सिद्ध करून दाखवा नाहीतर मी तुम्हाला तुरुंगात धाडेन असा इशाराही ममता बॅनर्जींनी दिला आहे.