वंचित बहुजन आघाडीमध्ये काहींनी आघाडी धर्म पाळला नाही. त्या कार्यकर्त्यांची आम्ही हकालपट्टी करणार हे नक्की आहे असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. सोलापुरात प्रकाश आंबेडकर जिंकतील याची आम्हाला खात्री होती. आता मी प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करतो आहे त्यांना याबाबत विचारणा करणार आहे. MIM च्या ज्या कार्यकर्त्याने सोलापुरात प्रकाश आंबेडकरांसाठी काम केलं नाही त्यांची हकालपट्टी केली जाईल हे निश्चित आहे असेही जलील यांनी म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांवर आम्ही कारवाई करणार आहोत हे नक्कीच आहे. मात्र राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने सोलापुरात जाऊन प्रकाश आंबेडकरांना मतदान करू नका आणि काँग्रेसलाही मतदान करू नका असं आवाहन केलं होतं त्यामुळे सोलापुरात भाजपाचा विजय झाला. अप्रत्यक्षपणे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनेच भाजपाला मदत केली आहे असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचा बडा नेता कोण ते नाव मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवलं आहे.

सोलापुरात प्रकाश आंबेडकर निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री होती. तरीही तिथे पराभव का आणि कसा झाला याचं चिंतन आम्ही करतो आहोत. वंचित बहुजन आघाडीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही त्यांची हकालपट्टी होणारच असं जलील यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.  महाराष्ट्रात आघाडी आणि युतीला पर्याय म्हणून तिसऱ्या आघाडीने निवडणूक लढवली. मात्र इम्तियाज जलील यांच्या एका जागेचा पर्याय वगळता वंचित आघाडीला फारसं यश मिळालं नाही. प्रकाश आंबेडकर सोलापुरात निवडून येतील असं वाटलं होतं मात्र ते पराभूत झाले आहेत. अशात ज्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांना मदत केली नाही त्यांची आम्ही हकालपट्टी करू असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.