|| भक्ती परब

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) वाहिन्या निवडीचा नवा नियम, आयपीएलचे सामने, उन्हाळ्याची सुट्टी, ऑनलाइन मनोरंजनाचे वाढते पर्याय असे अडथळे असूनही लोकसभा निवडणुकीमुळे वृत्तवाहिन्यांना फायदा झाला आहे. वृत्तवाहिन्यांनी सरासरी प्रेक्षकसंख्या टिकवण्यात यश मिळवले असून २३ मे रोजी निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी वर्षभरातील आतापर्यंतच्या सर्वाधिक टीआरपीची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर या दरम्यानच्या घडामोडी, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकांच्या तारखांची झालेली घोषणा, तसेच ‘झी अनमोल’, ‘कलर्स रिश्ते’, ‘सोनी पल’, ‘स्टार उत्सव’ या निशुल्क वाहिन्या सशुल्क झाल्यामुळे सरकारी ‘फ्री डीश’वरून त्यांचे प्रक्षेपण बंद होणे या सगळ्याचा फायदा वृत्तवाहिन्यांना झाला आहे. त्याचबरोबर गृहोपयोगी उत्पादनांचे जाहिरातदारही मोठय़ा प्रमाणात वृत्तवाहिन्यांकडे वळले आहेत.

‘ट्राय’च्या नव्या नियमानंतर बऱ्याच वृत्तवाहिन्या निशुल्क झाल्या. याचाही फायदा त्यांना मिळाला आहे. सध्या हिंदी वृत्तवाहिन्यांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या असून त्याखालोखाल प्रेक्षकांनी प्रादेशिक वृत्तवाहिन्यांना पसंती दिली आहे. चर्चात्मक कार्यक्रम, परिसंवाद, महत्त्वपूर्ण नेत्यांची भाषणे, जाहीर सभेचे थेट प्रक्षेपण यामुळे निवडणूक काळात प्रेक्षक वृत्तवाहिन्यांकडे आकर्षित झाले.

‘रिपब्लिक टीव्ही’, ‘डी डी इंडिया’, ‘आज तक’, ‘इंडिया टीव्ही’, ‘रिपब्लिक भारत’, ‘न्यूज १८ इंडिया’, ‘एबीपी माझा’, ‘टीव्ही ९ मराठी’ या वाहिन्यांना निवडणूक काळात बातम्यांसाठी प्रेक्षक पसंती मिळाली आहे. इतर भाषांच्या तुलनेत हिंदी भाषांतील वृत्तवाहिन्यांना सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभत असून गृहोपयोगी वस्तूंचे जाहिरातदार हिंदी वृत्तवाहिन्यांनंतर प्रादेशिक भाषांकडे वळत आहेत.

मराठी वृत्तवाहिन्यांसाठी लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. याचाही फायदा मराठी वृत्तवाहिन्यांना मिळणार आहे. एकंदरीत ‘ट्राय’चा निर्णय आणि त्या अनुषंगाने आलेले अनेक अडथळे पार करत वृत्तवाहिन्यांना निवडणुकांनी तारले असल्याचे चित्र दिसून येते आहे.

‘एबीपी माझा’चे संपादक राजीव खांडेकर याविषयी म्हणाले की, ‘ट्राय’च्या नव्या नियमाचा परिणाम वृत्तवाहिन्यांवरही झाला. पण ‘एबीपी माझा’ ८ फेब्रुवारीपासून निशुल्क वृत्तवाहिनी झाल्यामुळे आमचे स्थान इतर वाहिन्यांच्या तुलनेत स्थिर राहिले.

निवडणुकांच्या काळात वृत्तवाहिन्यांना इतर दिवसांपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या लाभते. मतमोजणीच्या दिवशी प्रेक्षकसंख्येत आणखी वाढ होते. प्रेक्षकांना आपल्या निर्णयाप्रत पोहोचण्यासाठी विविध पक्षांची, नेत्यांची मत-मतांतरे जाणून घ्यायची असतात. त्यामुळे निवडणूक काळात ते वृत्तवाहिन्यांकडे वळतात.