बोरीवलीत कार्यकर्त्यांकडून काही तरुणांना मारहाण; भाजप कार्यकर्ते असल्याचा दावा; भाजपचा इन्कार

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर यांच्या प्रचारफेरीदरम्यान ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देणाऱ्या काही तरुणांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने बोरिवली परिसरातील वातावरण सोमवारी तंग होते. हे तरुण सर्वसामान्य रेल्वे प्रवासी होते, असा दावा भाजपने केला आहे. तर हे भाजपचे कार्यकर्ते हुल्लडबाजी करण्यासाठीच प्रचारफेरीत घुसले होते, असा काँग्रेसचा आरोप आहे.

ऊर्मिला मातोंडकर यांची सोमवारी दुपारी बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर प्रचारफेरी सुरू होती. त्याच वेळी काही तरुणांनी मोदींच्या नावाने अचानक जयघोष करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते चिडले व त्यांनी ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी घोषणांचा ध्वनी वाढला असतानाच काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावे घोषणा देणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस व अन्य सुरक्षा जवानांनी हस्तक्षेप करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र त्यानंतरही दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरूच होती.

दरम्यान, मातोंडकर यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. ‘आमची प्रचारयात्रा शांतपणे सुरू होती. त्यासाठीच्या परवानग्याही आम्ही घेतल्या होत्या. तरीही त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला गेला. घोषणाबाजी करणाऱ्या काहींनी अश्लील हातवारे करत बीभत्स नृत्य करण्यास सुरुवात केली. रॅलीत अनेक महिला कार्यकर्त्यां होत्या. त्यामुळे आमचे कार्यकर्ते आक्रमक झाले,’ असे ऊर्मिला यांनी म्हटले.

दरम्यान, भाजपने या मारहाणीचा निषेध करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रवाशांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ‘सामान्य प्रवासी मोदी मोदी म्हणून आपल्या भावना व्यक्त करत असतील तर, त्याची जबाबदारी आमच्यावर कशी,’ असा प्रश्न भाजपचे उत्तर मुंबई मतदारसंघाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला.

मातोंडकर गप्प का?

‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आल्याचे सांगत ऊर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रचारफेरीच्या वेळी ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देणाऱ्या युवकांनी त्यांचे मत मांडले. तेही अभिव्यक्तिस्वातंत्र्यच होते. ते रेल्वे प्रवासी होते,’ असे भाजपचे नेते विनोद तावडे यांनी म्हटले. काँग्रेस कार्यकर्ते एका महिलेला मारहाण करत असताना मातोंडकर गप्प का राहिल्या, असा प्रश्नही त्यांनी केला.

निवडणूक व्यवस्थित पार पाडणे व विरोधकांना आपले मत चांगले मांडता यावे यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. विरोधकांची वारंवार गळचेपी केली जात आहे. लोकशाही दडपण्याचा सरकारचा प्रयत्न अतिशय निंदनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ असा फक्त नारा देतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याच पक्षातील नेते दररोज महिलांचा जाहीरपणे अपमान करत आहेत. मी झालेल्या प्रकाराचा निषेध करते.

– ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेसच्या उमेदवार