जळगावमध्ये सलग तिसऱ्यांदा उमेदवारी नाकारण्याची परंपरा कायम

जळगाव : भाजपने लोकसभेच्या जळगाव मतदारसंघाचे खासदार ए. टी. पाटील यांना नाकारत विधान परिषदेच्या सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने त्याची चर्चा सुरू आहे. सलग तिसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी जिल्ह्य़ात मिळत नाही हे सूत्र कायम राहिले आहे.

जळगाव जिल्ह्य़ात लोकसभेचे जळगाव व रावेर हे मतदारसंघ आहेत.  हे दोन्ही मतदारसंघ कधी काळी काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात. एकनाथ खडसे तसेच गिरीश महाजन यांच्यासारख्या इतर अनेक नेत्यांनी तळागाळातील मतदारांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोचविल्यानंतर दोन्ही मतदारसंघांवर भाजपचा झेंडा फडकण्यास सुरुवात झाली. जळगाव मतदारसंघात चार पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजपचे वर्चस्व आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराला किमान दोन वेळा खासदारकी भूषविण्याची संधी मिळाली. माजी खासदार एम. के. पाटील आणि विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचा त्यात समावेश आहे. या मतदारसंघात कोणत्याच खासदाराला भाजपने आजपर्यंत तीन वेळा संधी दिलेली नाही.

लागोपाठ दोनवेळा खासदार राहिलेले एम. के. अण्णा पाटील भाजप सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्रीही होते. तेव्हाच्या एरंडोल मतदारसंघात पाटील यांना तोड नसल्याची भावना जनसामान्यांत चांगलीच रुजली होती. लाचखोरी प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. नंतर भाजपमध्ये त्यांचे कोणतेच नामोनिशाण शिल्लक राहिले नाही. हेच आता खासदार ए. टी. पाटील यांच्या वाटय़ाला येत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. एरवी पारोळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेले ए. टी. पाटील फार चर्चेत नव्हते. मात्र, राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची निवडणूक लढविल्यानंतर त्यांचे नाव रात्रीतून प्रकाशझोतात आले. भाजपने पाटील यांना पक्षात घेऊन जळगावसाठी लोकसभेची उमेदवारी दिली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात खासदार पाटील यांच्याबाबतीत सकारात्मक अहवाल मिळाला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित म्हटले जाऊ लागले. कुठे माशी शिंकली, हे खासदारांनाही समजले नाही. त्यासाठी खासदार पाटील यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणारी चित्रफीत कारणीभूत झाल्याचे मानले जात आहे. उमेदवारी नाकारण्यामागे भाजपमधील अंतर्गत यंत्रणेने या वेळी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा सूर खुद्द खासदार पाटील यांनी लावला आहे. उमेदवारी नाकारण्यात आल्याने खासदार पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आता जळगावमध्ये राष्ट्रवादीचे गुलाब देवकर विरुद्ध वाघ यांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.