सांगली : सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून प्रारंभ होत असताना वाटय़ाला आलेला सांगली मतदार संघ ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाली आहे. तर वसंतदादा गटाकडून अंतिम क्षणी मदानात उतरण्याची तयारी सुरू केली असताना भाजपाच्या तंबूत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुसवेफुगवे काढण्यासाठी वेळ देत आहेत.

सांगलीची जागा काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीने आघाडीत हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला देऊन हानी न करता विधानसभेची जुळणी केली. या उलट आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेली काँग्रेस मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी अंतिम निष्कर्षांप्रत पोहचलेली नाही.

वसंतदादा घराण्याचा हा पारंपरिक मतदार संघ २०१४ च्या मोदी लाटेत हा मतदार संघ भाजपने हिसकावून घेतला. आता या पराभवातून काँग्रेस सावरलेली नसल्याने उमेदवारी द्यायची कोणाला याबाबत खल होऊ शकला नाही. पहिला हक्क असलेल्या प्रतीक पाटील यांनी उमेदवारी नाकारत असताना बंधू विशाल पाटील यांचे नाव सुचविले. त्यांनी आमदार विश्वजित कदम यांचे नाव सुचविले. कदम यांनी निवडणुक लढविण्यास नकार दिला. यामुळे सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून पक्षाने ही जागा मित्राला दान देण्याची भूमिका घेतली.

स्वाभिमानीला पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी आणि दरवेळी चिन्हाचा होणारा गोंधळ टाळण्यासाठी दोन खासदार निवडून येण्याची गरज असल्याने सांगली लढविण्यास अनुकूलता दर्शवली. मात्र उमेदवारीसाठी उसनवारी करावी लागणार होती. या उसनवारीच्या घोळात राष्ट्रवादीकडे उमेदवारी जात असल्याचे लक्षात येताच दादाप्रेमी गटाचे पित्त खवळले, आणि दादांच्या समाधीच्या साक्षीने राजकारण संन्यास, काँग्रेसचा त्याग, बंडखोरीची भाषा आणि मदन पाटील गटाला आमदारकी, विशाल पाटील यांना खासदारकी अशी वाटणीही झाली. या साऱ्या घडामोडीत खासदार शेट्टी यांची कोंडी झाली. दादा गटाला डावलून राष्ट्रवादीच्या जोरावर निवडणूक लढवली तर हातकणंगले, इचलकरंजीत याचा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे सावध झालेल्या शेट्टी यांनी वादग्रस्त जागाच नको अशी भूमिका घेत सबुरीचे धोरण स्वीकारले.

काँग्रेसची मोर्चेबांधणी

या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात आता उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळणार असल्याचे गृहीत धरण्यात आले असून यासाठीची मोच्रेबांधणी सुरू झाली आहे. या गटाला शत्रू पक्षातून कुमक मिळू नये यासाठी भाजपने तत्पूर्वीच रणनीती आखली आहे.