पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याविरोधात राग व्यक्त केला आहे. राहुल गांधींना पंतप्रधान करा, देश खड्ड्यात तरी जाईल किंवा चालेल तरी असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. देश खड्ड्यात घालायला हा काय मनसे आहे का,’ अशा शब्दांत त्यांनी टोला लगावत पुढे म्हटले की, ‘१२५ कोटी जनतेचा हा देश आहे. ही कुठली भाषा, स्वत:चं इंजिन बंद पडलंय, ते दुसऱ्याला लावून चालण्याचा प्रयत्न करत आहेत.  राहुल गांधी पंतप्रधान झालेलं शरद पवारांना तरी चालेल का, हे एकदा विचारुन बघा. नाहीतर पुढच्या स्क्रिप्ट बंद होतील,’ अशी उपहासात्मक टीका त्यांनी केली.

‘राज ठाकरेंनी इतकी मेहनत आधी घेतली असती तर मनसेला दुसऱ्यांसाठी सभा घ्यायची वेळ आली नसती. ज्या संजय निरुपमने राज ठाकरे यांना ‘फेकू’, ‘लुक्का’ म्हटले, त्या संजय निरुपमला मनसे कार्यकर्त्यांनी मतदान करायचं. जो कार्यकर्ता राज ठाकरेंना श्रद्धेच्या ठिकाणी पाहतो. त्याला लुक्का म्हणणाऱ्या संजय निरुपमांना मत द्यायचं म्हणजे हा मनसे कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे. शरद पवार, छगन भुजबळ, अजित पवारांबद्दल ते काय बोलले होते. म्हणजे महाराष्ट्रात दुष्काळ कसा पडतो म्हटल्यानंतर मोदींनी बघ कच्छमध्ये कसं काम केलंय. रोज सकाळी त्यांचे पाय धुवून पाणी प्या, असे म्हणत. आता कुठं गेले ते,’ असा प्रश्न त्यांनी विचारला.

‘भारतात लोकशाही व मानवी हक्काची जपणूक नसती तर युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कौन्सिलच्या सर्वोच्च परिषदेवर सुमारे १९३ देशांपैकी १८८ देशांनी भारताला पाठिंबा देऊन निवडून दिले असते का? जगातील सर्व देश मूर्ख आणि तुम्हीच खरे आहात का?’, असेही ते म्हणाले.