शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी ईव्हीएम मशीन बाबत शंका व्यक्त केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपल्याला कोणतीही शंका नसल्याचे सांगत शरद पवारांना घरचा आहेर दिला आहे. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी ईव्हीएम मशीन बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. एकाच पक्षातील आघाडीच्या नेत्यांमध्ये असलेली भिन्न मते महाराष्टाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे.

ईव्हीएम मशीनबाबत आपल्या मनात कोणतीही शंका शंका नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. इतकंच नाही, तर ईव्हीएममध्ये दोष असता तर भाजपाचा पाच राज्यात पराभव झाला नसता. पण काहींच्या मनात ईव्हीएमबाबात शंका आहे. आता यावर कोर्टाने निर्णय दिला आहे, असं म्हणत अजित पवारांनी काका शरद पवारांनाच अप्रत्यक्षरिता टोला लगावला आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपा सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली आहे. राज्यातील अनेक भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या सामोरे जावे लागत आहे. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यावर सरकारकडून काही उपाय योजना करताना दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे राज्याच्या अनेक भागातील दुष्काळी भागाचा दौरा करीत आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातुन संवाद साधत आहे. यातून प्रश्न आणि समस्या सुटणार नाही, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले होते शरद पवार-
घड्याळाचं बटण दाबल्यानंतरही कमळाला मत गेल्याचं मी डोळ्यानं पाहिलं आहे त्यामुळे मला ईव्हीएम मशीन बाबत चिंता वाटते असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. हैदराबाद आणि गुजरात या ठिकाणची काही ईव्हीएम मशीन लोकांनी माझ्यासमोर ठेवली आणि मला बटण दाबण्यास सांगितलं. मी घड्याळासमोरचं बटण दाबलं आणि कमळाला मत गेलं. हा प्रकार मी माझ्या डोळ्यानं पाहिला आहे असं शरद पवार यांनी साताऱ्यात म्हटलं आहे. साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनबाबत चिंता व्यक्त केली.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
ईव्हीएमविषयी शरद पवार यांनी घेतलेल्या संशयाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हाला ईव्हीएम नकोच अशीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा आवडता शब्द पारदर्शक आहे, पारदर्शकता हवी असेल तर ईव्हीएम नको”