मध्य प्रदेशातील भोपाळ मतदार संघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत. बाबरी मशिदीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साध्वी यांच्यावर तीन दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई केली होती. ही कारवाई रविवारी संपताच साध्वी यांना निवडणूक आयोगाने पुन्हा एक नोटीस पाठविली आहे.

प्रचारबंदी दरम्यान साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मंदिरात जाऊन भजन आणि किर्तनाच्या माध्यमातून प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसने केला. याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या प्रकरणावर कारवायी करताना निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पुन्हा नोटीस पाठविली आहे. यावर दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास निवडणुक आयोगानं साध्वी यांना सांगितले आहे. त्याचप्रमाणे मंदिरातील व्हिडीओ आणि फोटो जमा करण्यास सांगितले आहे.

बाबरी मशीद विध्वंसाबाबत बोलताना साध्वींनी आनंद व्यक्त केला होता. तसेच या कृत्याचा आपल्याला गर्व असल्याचेही त्यांनी म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले. त्यामुळे याबाबत कारवाई म्हणून त्यांच्यावर ७२ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली. ही बंदी गुरुवार सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहे. या काळात त्या कोणत्याही प्रचार रॅलीत, सभेत सहभागी होऊ शकणार नाहीत. तसेच कोणतीही मुलाखत तसेच प्रतिक्रियाही त्यांना देता येणार नव्हत्या. मात्र, या काळात साध्वी यांनी मंदिरात जाऊन भजव किर्तन करत प्रचार केला. असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. बाबरीच्या विधानापूर्वी त्यांनी २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. करकरेंचा सर्वनाथ होईल असा मी शाप दिला होता, असे त्या म्हणाल्या होत्या.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते योगी आदित्यनाथ यांच्यावरही वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने ७२ तासांची प्रचारबंदी घातली होती.