यंदाच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल समोर येत आहे. पार्थ पवार मावळमधून निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे राज्यात सध्या हा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे राजकारणात नवखे असलेले पार्थ पवार पराभवाच्या छायेत आहेत. बारणे यांच्याकडे सध्या दोन लाख मतांची आघाडी आहे. दोन लाखांची आघाडी मोडणं अशक्य दिसतेय. त्यामुळे श्रीरंग बारणे यांचा विजय जवळपास निश्चित समजला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन निवडणुकांत मावळ मतदारसंघात शिवसेनेचंच वर्चस्व आहे. यावेळी पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे हा मतदारसंघ चर्चेत आला. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली ताकद पणाला लावली मात्र, पार्थ यांना पराभवचा धक्का बसण्याची शक्यता आहे. नातू पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली.

गेली ५० वर्षे शरद पवार महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत १५ निवडणूका लढवल्या आहेत. गेल्या ५० वर्षात एकदाही पराभव न झाल्याचे शरद पवार यांनी अनेकवाळा सांगितेले आहे. ऐवढंच काय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीही आतापर्यंत पराभव पाहिला नाही. मात्र, पार्थच्या रूपानं पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्यता आहे.

मावळात अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना राष्ट्रवादीने िरगणात उतरवून चुरस निर्माण केली. पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष मावळच्या लढतीकडे लागले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा लोकसभेच्या िरगणात होते. तर, पार्थ आयुष्यातील पहिल्या निवडणुकीला सामोरे गेले. सुमारे २३ लाख मतदारसंख्या असलेल्या मावळसाठी ५९.४९ टक्के मतदान झाले. बारणे आणि पवार यांच्या मुख्य लढतीत वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील किती मते घेतात, यावर मावळच्या विजयाचे बरेचसे गणित अवलंबून असणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून हे मतदार मावळचा खासदार कोण, हे ठरवणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ रायगड, तर उर्वरित तीन पुणे जिल्ह्य़ातील आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election parth pawar vs srirang barane maval constituency ncp pawar family member first lose in eection lok sabha election
First published on: 23-05-2019 at 14:44 IST