लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर देशात नवे सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे पानिपत करून ‘शत-प्रतिशत’ भाजपला विजय मिळवून देणारे नरेंद्र मोदी ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. राष्ट्रपती भवनात सांयकाळी सात वाजता शपथविधी कार्यक्रम होणार आहे. मोदींच्या शपथविधीची जोरदार तयारी राष्ट्रपती भवनात सुरू झाली आहे. शपथविधी सोहळ्यासाठी ३ हजार पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात येणार आहे.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले जाणार असल्याची शक्यता आहे. याशिवाय, रशिया, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि सार्क देशांच्या नेत्यांनाही या सोहळय़ासाठी खास आमंत्रित केले जाणार आहे.

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला. राष्ट्रपतींनी मला सरकार स्थापन करायला सांगितले असून काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आहे असे मोदींनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर सांगितले.

१७ व्या लोकसभेची स्थापना ३ जूनच्या आधी केली जाणार आहे असेही समजते आहे. पुढील काही दिवसात मंत्रिमंडळाची स्थापना होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपाने गेल्या निवडणुकीचे आकडे मागे टाकून अभूतपूर्व यश मिळवलं. एकट्या भाजपाने ३०३ जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने ३५० पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी मोदीच विराजमान होणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.