राम मंदिर, कलम ३७० वरून भाजपशी मतभेदाने जनता दलाचा सावध पवित्रा

प्रत्येक राजकीय पक्षासाठी निवडणुकीच्या काळात मतदारांना निवडून आल्यास काय काम करणार याचा दस्तऐवज म्हणजे जाहीरनामा असतो. त्या आधारे पक्षाच्या कामाची दिशा काय हे ठरते असे मानले जाते. पण बिहारमध्ये सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलाने आतापर्यंत जाहीरनामा प्रसिद्धच केलेला नाही. आता शेवटच्या टप्प्यातील मतदानाला चारच दिवस उरले आहेत.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाने (युनायटेड) लोकसभा निवडणुकीकरिता जाहीरनामा तयार केला होता. पण जनता दलाने अद्याप जाहीरनामा प्रसिद्ध केलेला नाही. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा असून, आतापर्यंत ३२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. अखेरच्या टप्प्यात येत्या रविवारी आठ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

बिहारमध्ये जनता दल(यू) आणि भाजप युतीचे सरकार सत्तेत आहे. राम मंदिर, कलम ३७० कलमांवर जनता दलाची भूमिका भाजपपेक्षा वेगळी आहे. कारण बिहारमध्ये जवळपास १७ टक्के मुस्लीम मतदार असून जनता दलाची अल्पसंख्याक मतदारांमध्ये चांगली प्रतिमा आहे. भाजपला अनुकूल भूमिका घेतल्यास मुस्लीम मतदार विरोधात जाण्याची नितीशकुमार यांना भीती आहे. मुस्लीम मतदार लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर गेल्यास नितीशकुमार यांना धक्का बसू शकतो. यामुळेच भाजपच्या राम मंदिर आणि कलम ३७०च्या विरोधात भूमिका घेणे आवश्यक ठरते. भाजपच्या विरोधात जाहीरपणे भूमिका घेतल्यास विरोधक हा मुद्दा करण्याची शक्यता होती. भाजपच्या नेतृत्वानेही नितीशकुमार यांच्यावर दबाव आणल्याचे सांगण्यात येते.

भाजपशी युती असल्याने नितीशकुमार यांनी विरोधकांना आयते कोलीत नको म्हणून जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे टाळले आहे. यावरून राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस महाआघाडीने नितीशकुमार यांच्यावर टीकाही केली.