पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान

संपत्ती जमविल्याचे किंवा परदेशी बँकांमध्ये माझे पैसे सिद्ध करा असे खुले आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना येथील प्रचारसभेत दिले.

विरोधकांनी अपशब्द वापरण्याऐवजी हिंमत असेल तर मी मालमत्ता जमविल्याचे सिद्ध करा. माझे परदेशात कोठे खाते आहे का? किंवा महागडय़ा गाडय़ा खरेदी केल्याचे दाखवून द्या, असे आव्हानच त्यांनी दिले. मी श्रीमंत होण्याचे स्वप्नही पाहिले नाही तसेच गरिबांच्या पैशाची लूट केलेली नाही, असे पंतप्रधानांनी ठणकावले. पाकिस्तानची व दहशतवाद्यांची घाबरगुंडी उडाली असून, ते आता लपून बसले आहेत. लष्कराला काम करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने लक्ष्यभेद करण्यात आला, त्यानंतर दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाचा उल्लेख त्यांनी महामिलावटी असा पुन्हा एकदा केला. माझ्यावर असभ्यपणे टीका करणाऱ्यांना मतदारच उत्तर देतील, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. गाझिपूर येथे सप-बसप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा संदर्भ देत, निकाल जाहीर झाल्यावर आज गळ्यात गळे घालणारे पक्ष पुन्हा एकमेकांवर टीका करू लागतील असे भाकीतही पंतप्रधानांनी वर्तवले.

‘काँग्रेसच्या उर्मटपणाला जनता उत्तर देईल’

सासाराम, बक्सर (बिहार) : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शिखविरोधी दंगलींबाबत, जे झाले ते झाले, असे जे वक्तव्य केले होते. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या या अहंकाराला जनता उत्तर देईल, असा इशारा पंतप्रधानांनी सासाराम येथील सभेत दिला.

राहुल यांच्या गुरूंनी  हे जे वक्तव्य केले त्यातूनच त्यांची मानसिकता दिसते, असा टोला मोदींनी लगावला. काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल देशाला अंधकाराकडे नेतील असा इशारा पंतप्रधानांनी बिहारमधील बक्सर येथील सभेत दिला.