भगवान मंडलिक

मातीचा रस्ता, गाळाने तुंबलेली गटारे, अंगणवाडीचीही पडझड

ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान योजनेतून दत्तक घेतलेल्या कल्याण तालुक्यातील पिंपरी गावात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच कचरा, गाळाने भरलेली गटारे, खडी-माती टाकलेले रस्ते, पडझड झालेली अंगणवाडी असे चित्र या गावात फिरताना दिसून येते.

२०१४मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेऊन त्याचा सर्वागीण विकास करावा, यासाठी ‘सांसद आदर्श ग्राम योजना’ जाहीर केली होती. या गावांतील प्राथमिक सुविधांवर भर देतानाच विविध सरकारी योजनांच्या मदतीने तेथे रस्ते, वीज, मनोरंजनाची साधने, क्रीडांगणे अशा सुविधा उपलब्ध करून देणे खासदारांकडून अपेक्षित होते. त्यानुसार शिवसेनेचे ठाणे येथील खासदार राजन विचारे यांनी शिळफाटा-पनवेल रस्त्यावरील दहिसर-मोरी गावाजवळील डोंगराच्या पायथ्याशी असलेले पिंपरी गाव दत्तक घेतले होते. मात्र, ठाणे महापालिकेस लागूनच असलेल्या आणि नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या १४ गावांपैकी असलेल्या पिंपरी गावाची सध्याची अवस्था पाहता ही दत्तक योजना ग्रामस्थांना सुविधांच्या आघाडीवर निराधार करून गेल्याचे चित्र आहे.

पिंपरी गाव हे कोयना धरणातील विस्थापितांचे गाव. घरटी एक माणूस शासकीय, खासगी नोकरीत आहे. गाव खासदारांनी दत्तक घेतले म्हणून सुरुवातील गावकऱ्यांना खूप आनंद झाला. गावात सीमेंट रस्ते, चोवीस तास पाणी, गावात क्रीडांगण, तलावाचा सर्वागीण विकास, बंदिस्त गटारे सुविधा गावात उपलब्ध होतील, अशी सुखस्वप्ने येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आली. प्रत्यक्षात गेल्या पाच वर्षांत खासदार विचारे यांनी केवळ तीन ते चार वेळा गावाला भेट दिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावालगतच्या तलावाच्या सुशोभीकरणाखेरीज कोणतेही काम येथे झाले नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. ‘आम्ही सरकारी नोकर आहोत. खासदाराविरोधात गावाच्या समस्यांविषयी बोललो तर उगाच रोष नको, आमची नावे प्रसिद्ध करू नका’, अशी आग्रहाची विनंती गावक ऱ्यांकडून प्रस्तुत प्रतिनिधीला करण्यात आली.

गावातील अंगणवाडीच्या भिंतींची दयनीय अवस्था झाली आहे. तेथे दारात कचऱ्याचे ढीग तर अंगणवाडीच्या खोल्यांत कुत्र्यामांजरांचे आश्रयस्थान बनले आहे. गावातील रस्ते अरुंद आहेतच परंतु, त्यावरही टपऱ्या आणि भंगारचालक यांचे अतिक्रमण झाले आहे. गावात ग्रामपंचायतीची रंगीबेरंगी रंगाने रंगवलेली ग्रामपंचायतीची इमारत आहे. या देखण्या इमारतीसारखा गावचा कारभार होत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली. घरोघरी कूपनलिका आहेत म्हणून पाण्याची समस्या येथे जाणवत नाही, हे विशेष.

दरम्यान, हे गाव दत्तक घेणारे खासदार राजन विचारे यांची गावातील कामांबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. खासदार हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. मात्र, वारंवार संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.

विस्थापितांचे गाव

पिंपरी गावात कोयना येथून विस्थापित झालेली १८४ कुटुंबे आहेत. २२०० लोकसंख्या गावात आहे. बाराशे ते तेराशे मतदार आहेत. ‘आम्ही पडलो सरकारी नोकर. कोण या भानगडीत पडणार? वाटलं होतं गावाचा पालक खासदार आहे. चांगले काही तरी होईल. पण दत्तक योजना दिवास्वप्न ठरली आहे,’ असे या भागातील ग्रामस्थांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.