News Flash

‘बहुजन’ बांधणीला ‘वंचितां’ची आर्थिक मदत

सुशीलकुमार चिकटे यांनी मुलीच्या लग्नासाठी म्हणून ठेवलेले दहा लाख रुपयांचे बचतपत्र मोडले.

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनाच्या कोपऱ्यात बाबासाहेबांची भेट झाल्याची आठवण जपून ठेवणारे नरहरी केरबा कदम यांनी उस्मानाबादच्या सभेत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला पाच हजार रुपये निवृत्ती वेतनातून दिले. अहमदपूरच्या सभेत सुशीलकुमार चिकटे यांनी मुलीच्या लग्नासाठी म्हणून ठेवलेले दहा लाख रुपयांचे बचतपत्र मोडले. जेथे सभा होते तेथे वंचित बहुजन आघाडीसाठी निधी दिला जात आहे.

लातूर शहरातील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमध्ये सुशीलकुमार चिकटे राहतात. भुसार मालाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी ब्युटीपार्लर चालवितात. दोघांनी मुलीच्या लग्नासाठी मुदत ठेव योजना सुरू केली होती. त्याची रक्कम मार्चमध्ये मिळणार होती. तत्पूर्वी चिकटे यांनी बौद्ध भिक्खू यांना चिवरदान करण्याचे ठरविले होते. चिवर म्हणजे भिक्खू यांच्या अंगावरील वस्त्र. या कार्यक्रमाला प्रकाश आंबेडकर यांचे बंधू भीमराव आले होते. आर्थिक पातळीवर सुशीलकुमार यांचे बरे चालले होते. ते सांगतात, बाबासाहेबांच्या कृपेमुळे आता माझे वातानुकूलित कार्यालय आहे. त्यांचा नातू निवडणुकीत उभा आहे. त्यांना कदाचित पैशाची गरज असेल असे वाटले आणि पत्नीला विचारून अनामत रक्कम प्रकाश आंबेडकर यांना देण्याचा निर्णय घेतला. समाज बांधायला ते निघाले आहेत. निवडणुकीत तर पैसा लागतोच. तो आपल्याकडून द्यावा अशी इच्छा होती. खरे तर सभेत ही रक्कम द्यायची नव्हती. पण सर्वानी आग्रह केला आणि दहा लाखांची रक्कम दिली. निवडणुकीच्या काळात वाहने अडवली जातील. आणलेल्या रकमेचा स्रोत विचारला जाईल म्हणून सगळी कागदपत्रे बरोबर घेतली आणि अहमदपूरच्या सभेत रक्कम प्रकाश आंबेडकर यांना सुपूर्द केली. सुशीलकुमार चिकटे यांना प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी भाजपची ‘बी’ टीम असल्याच्या आरोपाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, ‘मला राजकारण कळत नाही. पण बाकी मंडळी अपप्रचार तर करणारच.’

उस्मानाबादच्या सभेत निवृत्ती वेतनातून पाच हजार रुपये देणारे नरहरी कदम यांचे नातू संदीप सांगत होते, ते समाज एक करण्याचे काम करत आहेत. त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे, असे वाटले. आजोबांना बाबासाहेब भेटले होते. त्यांचा नातू आता समाज बदल घडवून आणत आहे, त्यांना मदत करावीशी वाटली, आम्ही ती केली.’  बीडच्या नागसेन बुद्ध विहारात नेहमी जमणाऱ्या जिजाबाई साळवे यांच्या सहकाऱ्यांचा बचतगट आहे. या बचतगटाने अलीकडेच माजलगावच्या सभेत प्रकाश आंबेडकरांना निवडणूक निधी दिला. त्या म्हणाल्या, आम्हाला त्यांचा आधार वाटतो. त्यांना आता निवडणुकीत पैशांची गरज असेल म्हणून आम्ही त्यांना मदत करत आहोत.  राजकारणात जे देतील त्यांच्याकडून पैसे घ्या, पण मतदान आम्हालाच करा असे आवाहन थेटपणे होते, अशा काळात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला स्वत:हून रक्कम दिली जात आहे.

ते (प्रकाश आंबेडकर) सारा समाज एकत्र करीत आहेत. निवडणुकीत त्यांना पैशांची गरज असेल असे वाटले आणि आम्ही मदत केली. त्यांच्या सभांमुळे विरोधकांना धडकी भरत आहे. त्यामुळे त्यांच्यावर ‘बी’ टीम असल्याचा आरोप होतो आहे. पण, तो अपप्रचार आहे. ते सारे काही आमच्यासाठी करत आहेत.’ – संदीप शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 1:54 am

Web Title: retired army man donate 5000 from pension to prakash ambedkar party
Next Stories
1 जालन्यात काँग्रेसमध्ये शुकशुकाट, भाजप सुशेगात
2 अपंगांसाठी व्हिलचेअर, पण रॅम्प नाहीच!
3 स्फोटानंतर गडचिरोलीत एका केंद्रावरील मतदान रद्द
Just Now!
X