भगवान मंडलीक

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ३ लाख ४४ हजार ३४३ इतके मताधिक्य मिळवून राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांचा दारुण पराभव केला. या मतदारसंघातील अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाले आहे. तर राष्ट्रवादीचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांनी नऊ हजार ८८१ मतांची आघाडी घेतली. असे असले तरी हे मताधिक्य फारच कमी असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. तसेच टपाली मतदानामध्ये सर्वाधिक सतराशे मत मिळविण्यात शिंदे यांनी बाजी मारली.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांनी २७ फेऱ्यांमध्ये ६५ हजार ३६२ मते मिळविली आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघांतील झोपडपट्टी वस्त्यांमधील हक्काची मते हेडाऊ यांना मिळाल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे असल्याने संघर्ष समितीने पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात रान उठविले होते. मतदानाच्या दिवशी गावामध्ये बाबाजी यांना मतदान करण्याचा संदेशही धाडला होता. त्यामुळे या भागातून बाबाजी यांना लाखभर मताधिक्य मिळेल, असे दावे केले जात होते. प्रत्यक्षात मात्र निकालाच्या आकडेवारीवरून हे दावे फोल ठरले आहेत. या भागातून बाबाजी यांना ४३ हजार ८६९ इतकी मते मिळाली तर शिवसेनेला एक लाख २६ हजार ६०७ मते मिळाली आहेत. त्याचप्रमाणे उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली या मतदारसंघांमध्येही शिंदे यांना मताधिक्य मिळाले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण आठ लाख ८७ हजार ९५५ मतदान झाले होते. त्यापैकी १३ हजार १२ मतदारांनी नोटाचा वापर केला.