गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचा आवाज!

अरविंद सावंत, शिवसेना

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केली?

दक्षिण मुंबईकरांच्या समस्यांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतर जकात बंद झाली. त्यामुळे मुंबई महापालिकेला नुकसानभरपाई मिळावी म्हणून कायद्यात तरतूद करून घेतली. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान टळले. ‘मोफत शिक्षण अधिकार’ नाही तर ‘दर्जेदार मोफत शिक्षण अधिकार’ मिळावा यासाठीही प्रयत्न केले. शिवडी येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील रहिवाशी, कापड गिरण्यांच्या जागेवरील रहिवाशी, शापुरजी पालनजी कंपाऊंड (परेल) येथील इंडियन कॅन्सर सोसायटी व टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन आदी प्रश्नाबाबत लोकसभेत वाचा फोडली. खासदार निधीतून जे. जे. रुग्णालयाला अत्याधुनिक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स दिली. अनेक सुसज्ज, अत्याधुनिक व्यायामशाळा, खुल्या व्यायामशाळा उभारल्या. मुंबईचे प्रतिनिधित्व देशपातळीवर करतानाच थेट संयुक्त राष्ट्र महासभेत (युनो) देशाचे प्रतिनिधित्व केले.

मुंबईतील महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी योजना काय आहे?

लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यापासून स्थानकांवर दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्यापर्यंत अनेक कामे केली. परळ टर्मिनससह विविध ठिकाणच्या प्रलंबित पुलांचे काम पूर्ण व्हावे, स्थानकांचे नूतनीकरण व्हावे या दृष्टीने प्रयत्न केले. कामे वेळेत व उत्तम प्रकारे व्हावी याकडेही माझा कटाक्ष होता. आगामी काळात रेल्वेच्या अन्य पुलांचे काम नियोजनबद्ध आखणी करून पूर्ण करून घेणे, जुन्या पुलांकडे विशेष लक्ष देणे, स्थानकांवर अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, लोकल रेल्वेच्या डब्ब्यात शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देणे, एलिव्हेटेड ट्रेन्स, सुरक्षेसाठी ड्रोन इत्यादी अनेक योजना रेल्वे प्रवाशांसाठी तडीस नेण्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी सागरी किनारा मार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील.

लोकांनी तुम्हालाच मते का द्यावीत?

लोकसभा सत्रात हजर राहण्यात, सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न विचारण्यात, लोकहिताच्या चर्चेत सहभागी होण्यात माझा क्रमांक देशात सर्वप्रथम आहे. लहानपणापासून मी याच भागात राहात असून तळागाळातील लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मला जाण आहे. चोवीस तास मी जनसेवेसाठी उपलब्ध आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाचा आवाज म्हणून मी कायम ओळखलो गेलो आहे. मी केलेल्या विकासकामांमुळे दक्षिण मुंबईतील जनता परत प्रचंड मताधिक्याने निवडून देईल.

पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

देश-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मत्स्यालय, थीम पार्क उभारणी, एनटीसीच्या गिरण्यांच्या जमिनी विकसित करून तेथे निवासी प्रकल्पाऐवजी उद्योग वा सेवा क्षेत्राचा विकास करून रोजगारनिर्मिती करणे, एनटीसी, एलआयसीच्या जमिनीवरील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी मिळविणे, केंद्राकडून भरघोस निधी आणून मुंबईचा विकासाचा प्रयत्न करणार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात पाठपुरावा, आरोग्यविषयक सुविधा सहजगत्या उपलब्ध व्हावी, शेतकरी, कामगार, पगारदार, व्यापारीवर्ग, बेरोजगार, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आखलेल्या योजनांमध्ये योगदान देणार.

भाडेकरू, जुन्या इमारतींमधील रहिवाशांना प्राधान्य!

मिलिंद देवरा, काँग्रेस</strong>

(संग्रहित छायाचित्र)

गेल्या पाच वर्षांत आपण मतदारसंघात संपर्क ठेवला नाही, असा आरोप केला जातो. याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय?

मी मतदारसंघात संपर्कात होतो. कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी सुरू होत्या. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या विविध समित्यांवर काम करीत होतो.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय आपण दक्षिण मुंबई मतदारसंघातील उमेदवार आहात. या दोन्ही आघाडय़ांवर एकाच वेळी कसा सामना करणार?

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अगदी निवडणुकीच्या तोंडावर नियुक्ती झाल्याने पक्ष बांधणीला तेवढा वेळ मिळाला नाही. तरीही मुंबईतील पक्षाच्या उमेदवारांशी संपर्कात राहून समन्वय ठेवणे व प्रचाराची जबाबदारी पार पाडत आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघात मी स्वत:च उमेदवार असल्याने प्रचार, पदयात्रा याला जास्त वेळ द्यावा लागतो. तरीही दोन्ही आघाडय़ांवर एकाच वेळी कसरत करीत आहेत.

गेल्या पाच वर्षांतील विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या कामगिरीविषयी आपले मत काय आहे?

खासदार पाच वर्षे कुठे दिसलेच नाहीत, असा सार्वत्रिक सूर मला प्रचाराच्या काळात मतदारसंघात ऐकायला मिळाला. पाच वर्षांत मतदारसंघात असे एखादे महत्त्वाचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागले हे खासदारांनी दाखवून द्यावे. त्यांच्या विरोधात १३ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, यातून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी सत्तेचा गैरवापर केला आहे.

दक्षिण मुंबईत रेल्वे आणि वाहतूक हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी काय योजना आहे?

वाहतूक हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण मुंबई हे व्यापारी केंद्र असल्याने मुंबई, ठाणे, पुण्यापासून दररोज लाखो लोक या परिसरात येतात. दुर्दैवाने या परिसरात योग्य वाहतूक व्यवस्था विकसित होऊ शकली नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे हाच त्यावर उपाय आहे. चांगल्या रस्त्यांबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देण्यावर आपला भर राहील.

तुम्हालाच लोकांनी मते का द्यावीत?

भाजप सरकारच्या काळात लोकांचा भ्रमनिरास झाला. व्यापारी, लघुउद्योजक, छोटे दुकानदार हे नोटाबंदी व वस्तू आणि सेवा करामुळे अक्षरक्ष: रडकुंडीला आले आहेत. दक्षिण मुंबईतील आर्थिक उलाढाल घटली आहे. पाच वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईत उद्योगांची चलती होती. पण आता काय परिस्थिती आहे. राष्ट्रीय पातळीवरही चित्र वेगळे नाही. यामुळेच लोकांनी आता काँग्रेसला मते द्यावीत.

पुढील पाच वर्षांत कोणती कामे करणार?

दक्षिण मुंबईत जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. भाडेकरूंचे प्रश्न आहेत. भाडेकरू, जुन्या इमारतींमधील रहिवाशांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन, वाहतूक व्यवस्था सुधारणे यावरच भर राहील. दहा वर्षे खासदार असताना किंवा आपले पिता मुरली देवरा यांनी प्रतिनिधित्व करताना याच प्रश्नावर लक्ष दिले होते. केंद्र सरकारच्या जागेवरील झोपडय़ांचा प्रश्न सुटलेला नाही. हे सारे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य असेल.

राफेलवरून काँग्रेसने अनिल अंबानी यांना लक्ष्य केले असताना मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दिल्याबद्दल भूमिका काय आहे?

दक्षिण मुंबईतील सर्वच वर्गातील मतदारांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. यात मुकेश अंबानी, उदय कोटक अशासारख्यांचा समावेश आहे. मतदारसंघाचा विकास आपणच करू शकतो याची कल्पना असल्याने ते आपल्या पाठीशी उभे आहेत.