उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय सुरेंद्र सिंह यांची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. एकूण पाच संशयित आहेत ज्यापैकी दोघेजण फरार झाले असून तिघांना आम्ही अटक केली आहे अशी माहिती उत्तर प्रदेशचे डीजीपी ओ. पी. सिंग यांनी दिली आहे. घडलेल्या घटनेनंतर आम्ही जे पुरावे गोळा केले त्यात या प्रकरणात पाच जणांवर संशय आहे पाचपैकी तिघांना आम्ही अटक केली असून उर्वरित दोघांचा तपास सुरू आहे असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे. हे पाचही संशयित स्थानिक आहेत त्यांनी राजकीय वादातून सुरेंद्र सिंह यांची हत्या केली असे पोलिसांनी म्हटले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अमेठीत स्मृती इराणींसाठी सुरेंद्र सिंग यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अमेठीतून स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना हरवले. सुरेंद्र सिंग हे स्मृती इराणी विश्वासू कार्यकर्ते होते. त्यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.अमेठीतील बरौलिया गावाचे ते प्रमुख होते. शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांची हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंग यांचे मारेकरी पाताळात जरी लपले तरीही त्यांना शोधून काढू असे स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.