निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेत्यांच्या सभा, प्रचार यात्रा आणि प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती हे ओघाने आलेच. अधिकाधिक प्रसिद्धी मिळावी, यासाठी अनेक नेत्यांमध्ये तर अहमहमिका लागते. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती न देण्याचा निर्धार केला. गेली चार-साडेचार वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात डरकाळ्या फोडून झाल्यावर पुन्हा हिंदूत्वाची ढाल पुढे करून युतीच्या आणाभाका घेतल्याने ठाकरे यांची तशी पंचाईतच झाली. त्यातच गांधीनगरला जाऊन शहा यांची गळाभेट घेतल्याने बराच गदारोळ झाला. त्यामुळे मग ‘सामना’मधून सारवासारव झाली, प्रचारसभांमध्ये खुलासे करण्याची वेळ आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मुलाखती देण्यास सुरुवात केली. मात्र ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना मुलाखती देण्यास ठाम नकार दिला. भाजपशी युतीबाबत उलटसुलट प्रश्न टाळण्यासाठी आणि मुलाखतींवरून कोणताही नवीन वाद सुरू होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस हेच बोलतील, असे उभयपक्षी ठरल्याचे निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. पण प्रथमच ठाकरे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना डावलल्याने त्याविषयी मात्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मानापमान नाटय़ाचा आणखी एक अंक

शिवसेनानेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेचे भाजप खासदार पूनम महाजन यांच्याशी चांगलेच बिनसले आहे. आदित्यचे छायाचित्र महाजन यांच्या प्रचार फलकांवर नसल्याने संतप्त झालेल्या युवा सेनेच्या कार्यकत्यांची नाराजी शमविण्यासाठी महाजन यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर धाव घेऊन उद्धव यांच्याशी चर्चा करूनही सारेकाही आलबेल नाही. कुर्ला-नेहरूनगर येथील बुधवारच्या प्रचारसभेत आदित्य यांचे छायाचित्र नसल्याने युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा आक्षेप घेतल्याने महाजन यांची चांगलीच धावपळ झाली. अकेर छायाचित्र लावले गेले. महाजन-ठाकरे कुटुंबीयांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जात असले तरी महाजन या भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर तरुणवर्ग आकर्षित करताना ‘भाजयुमो’ची मुंबईसह राज्यात शिवसेनेच्या युवासेनेशी चांगलीच स्पर्धा आहे. आदित्य हे तरुणांसाठी ‘आयकॉन’ आहेत, सर्वात लोकप्रिय नेता आहे, अशी त्यांच्याविषयीची युवा सेनेची भूमिका असून उत्तर-मध्य मुंबईतून आदित्य यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चाचपणीही केल्याच्या चर्चा याआधी रंगल्या होत्या. युवा सेनेच्या तुलनेत ‘भाजयुमो’चा वरचष्मा असल्याने ही नाराजी आहे की अन्य काही कारणे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी युवा सेनेकडे जी महत्त्वाची भूमिका होती, तशी या निवडणुकीत नसल्याचाही हा परिणाम आहे की काय, अशी शंका आहे. शिवसेनानेते व कार्यकर्ते मात्र फारसे काही मनावर न घेता युतीधर्माचे पालन करीत आहेत.