मराठवाडय़ातल्या आठ लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी १२ लाख ४२ हजार ८६९ मते मिळविली. विशेष म्हणजे राज्यातून एकमेव उमेदवार मराठवाडय़ातून निवडून आला आहे. आमदार इम्तियाज जलील दलित आणि मुस्लीम मतांच्या एकत्रीकरणातून खासदार झाले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह बहुतांश काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांचा फटका बसला. या आघाडीची मतांची टक्केवारीही वाढली आहे. औरंगाबादेतील या ध्रुवीकरणाचे परिणाम विधानसभा निवडणुकीतही जाणवतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोलापूर, नांदेड, परभणी या जागांवर महायुतीचा उमेदवार विजयी होण्यामागे वंचित बहुजनच्या उमेदवाराला मिळालेली मते कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. हिंगोली आणि नांदेड या दोन मतदारसंघात धनगर आणि हटकर या समाजाची मते अधिक होती. त्यामुळे त्याचा सेना-भाजपला फटका बसेल, अशी चर्चा केली जात होती, मात्र तसे घडले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना नुकसान सहन करावे लागले. नांदेडमध्ये यशपाल भिंगे यांनी एक लाख ६५ हजार ३४१ मते मिळविली. नांदेडच्या निवडणुकीत प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर ‘मॅनेज’ न होणारा उमेदवार या प्रतिमेचा त्यांना फायदा झाला. मात्र, निवडणुकीच्या विजयात भिंगे यांनी घेतलेली मते महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. मराठवाडय़ात सर्वाधिक मते मिळविणाऱ्या भिंगेंपाठोपाठ मोहन राठोड यांनी एक लाख ५८ हजार ५९३ मते मिळविली.

मराठवाडय़ातील बहुतांश मतदारसंघात लाखाचा टप्पा गाठणारी आणि ओलांडणारी मते मिळविणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला औरंगाबादमध्ये यश आले. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर एकवटलेले दलित प्रकाश आंबेडकर यांच्या बाजूने थांबले. तर औवेसींच्या भाषणांनी प्रभावित झालेल्या औरंगाबादकरांनी पुन्हा एकदा ‘पतंग’ हवेत उडवला आणि इम्तियाज जलील यांना ३ लाख ८९ हजार ४२ मते पडली. ते विजयी झाले. विजयापूर्वी ग्रामीण भागातूनदेखील उमेदवाराला अनेकांनी आर्थिक स्वरुपाची मदत देऊ केली होती. मात्र, ही रक्कम तुम्ही तुमच्या पातळीवर खर्च करा, असे इम्तियाज जलील त्यांच्या सभांमध्ये सांगत होते. दलित- मुस्लीम मतांचे एकत्रीकरण हे वंचित बहुजन आघाडीचे शक्तिस्थान असू शकते, हा राजकीय पट औरंगाबादमध्ये यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. औरंगाबाद वगळता बहुतांश महायुतीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी किती मते मिळविते याकडे आवर्जून लक्ष द्यावे असे वाटत होते. औरंगाबादमध्ये विजयाच्या जवळ जाऊ, असा विश्वास एमआयएमच्या कार्यकर्त्यांना वाटत होता. दर लोकसभा निवडणुकीत बसपाचा वाटा नक्की ठरलेला असतो. ४० ते ४५ हजार मते त्यांच्या पदरात पडतात. या वेळी त्यातही मोठी फूट दिसून आली. औरंगाबादमध्ये बसपाचे उमेदवार जया बाळू राजकुंडल यांना केवळ चार हजार ८३० मते मिळाली.

मराठवाडय़ातील वंचित बहुजन आघाडीची मते

(औरंगाबाद)      इम्तियाज जलील ३,८९०४२

(परभणी)            आलमगीर खान   १,४९९४६

(लातूर)         राम गरकर      १,१२,२९५

(हिंगोली)        मोहन राठोड १,५८,५९३

(उस्मानाबाद)    अर्जुन सलगर    ९८,५७९

(जालना)        शरद वानखेडे     ७६,९३४

(बीड)           विष्णू जाधव          ९२१३९

(नांदेड)         यशपाल भिंगे    १,६५३४१

(औरंगाबाद)      जया बाळू राजकुंडल    ४८३०