19 November 2019

News Flash

‘या पराभवाचा नक्की विचार करू’; शरद पवार यांची कबुली

"लोकसभेच्या निवडणुकीचा आज जो निकाल आला आहे, त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती."

लोकसभेच्या निवडणुकीचा आज जो निकाल आला आहे, त्यापेक्षा आमची अपेक्षा वेगळी होती. मात्र लोकांनी निर्णय दिला तो राष्ट्रवादी, काँग्रेस महाआघाडीला मान्य आहे. या पराभवाचा विचार नक्की करू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पराभव मान्य केला. दुपारी मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी पत्रकारांना संबोधित केले.

“महाआघाडीने जो प्रयत्न केला, त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार! कार्यकर्त्यांना धन्यवाद. लोकांनी जो निर्णय दिला, तो आम्ही स्वीकारतो. निवडणूक झाली, निकाल लागले, या पराभवातून आम्ही बोध घेऊ, लोकांशी संपर्क वाढवू. पण आता राज्यात दुष्काळ भीषण आहे. संकटग्रस्त लोकांना मदत करणार आहे. त्यामुळे दुष्काळासंबंधी जो कार्यक्रम हाती घेतला आहे, तो तसाच सुरु ठेवणार”, असे शरद पवार यांनी सांगितले.

“ज्या जागा आम्ही गमावल्या, त्या कमी फरकाने गमावल्या आहेत. मागच्या वेळी मतांचे अंतर मोठे होते. यावेळी मतांचे तेवढे अंतर नाही. या निवडणुकीत भाजपला यश मिळाले आहे. यश हे यशच असतं, ते आम्ही स्वीकारलं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक असो किंवा मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील निवडणूका असतील त्यावेळी कोणताही संशय घेण्यात आला नाही, परंतु या वेळेला झालेल्या निवडणुकीत निवडणूक आयोग असो की सत्ता चालवणारे सत्ताधारी असोत, यांच्याबद्दल देशभरात संशयाचे वातावरण होते, हे नक्की परंतु निकाल काही वेगळाच आला आहे”, असेही ते म्हणाले.

आमचा ११ जागांचा अंदाज होता. आमच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले आहे. कष्ट घेतले. त्यामुळे आम्ही व आमचे कार्यकर्ते पराभवाकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत, हेदेखील पवार यांनी स्पष्ट केले.

First Published on May 23, 2019 8:02 pm

Web Title: we will think and evaluate this defeat says ncp chief sharad pawar
Just Now!
X