राज्यमंत्री आणि शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका करताना त्यांना जनरल डायर संबोधले होते. त्याच्या या टीकेला राष्ट्रावादीचे कार्यकर्तेच उत्तर देतील असे मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड येथील कामगार मेळाव्यात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.

अजित पवार यांना बारामतीचा जनरल डायर असा उल्लेख करीत शिवतारे यांनी टीका केली होती. यावर पार्थ यांना विचारले असता या टीकेला कार्यकर्तेच उत्तर देतील असे ते म्हणाले. दरम्यान, पार्थ पवार हे कामगारांच्या मेळाव्यात मंचावरून भाषण करतील असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही.

मावळ लोकसभा मतदार संघात युतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलताना शिवतारे यांनी पार्थ पवार यांची खिल्ली उडवली होती. मात्र, यावर ते राजकारण करीत आहेत, त्यांना ते करु द्या, असे म्हणत पार्थ पवार यांनी यावर अधिक बोलणे टाळले.

शिवतारे म्हणाले होते, काल-परवापर्यंत मुंबई, पुणे आणि गोव्यात पबमध्ये नाचणारा तरुण आता रथयात्रेत नाचू लागतो. काय जादू आहे या लोकशाहीची विदेशी गाड्यात फिरणारा तरुण ट्रेनमध्ये बसत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात जात आहे.