लोकसभा निवडणुकींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा आणि मित्रपक्षांनी ३५० जागांपर्यंत मजल मारली आहे. असे असतानाच दुसरीकडे काँग्रेस अनेक राज्यांमध्ये भोपळाही फोडू शकलेली नाही. देशात केवळ ८५ जागांवरच काँग्रेसला विजय मिळाला आहे. यावरुन अनेकांनी काँग्रेसला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. सुरतमधील एका आमदाराने तर चर्चगेटवरुन ट्रेन पकडून उत्तरेकडे प्रवास केल्यास काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल असे खोचक ट्विट केले आहे.

सुरतमधील मजुरा येथील आमदार आणि भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या हर्ष सांघवी यांनी काँग्रेसच्या पराभवावर खोचक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘जर तुम्ही चर्चगेट स्थानकावरुन ट्रेन पकडून उत्तरेकडे प्रवास सुरु केला तर तुम्हाला काँग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल.’ व्हॉट्सअपवर हा मेसेज फॉर्वडर होत असून तोच मेसेज सांघवी यांनी ट्विट केला आहे.

मुंबईपासून सुरुवात केल्यास अगदी पंजाबपर्यंतचा सर्व प्रदेश भाजपाने जिंकला आहे असंच भाजपा समर्थकांना सांगायचे आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड अशा सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. केवळ पंजाबामध्ये काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. पंजाबमधील १३ पैकी ८ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. पंजाबमध्ये यंदा सरासरी ६१.४० टक्के मतदान झाले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसला ४० टक्के मते मिळाली असून भाजपाला पंजाबमध्ये १० टक्के मते मिळाली असून केवळ दोन जागा जिंकता आल्या आहेत.